पुणे : कबड्डीत महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या तसेच २१ वर्षांखालील मुलांच्या संघांचे स्पधेर्तील आव्हान संपुष्टात आले असले तरी २१ वर्षांखालील मुलींचा संघ मात्र जोरात आहे. या संघाने आहे दुपारच्या सत्रात अखेरच्या साखळी लढतीत उत्तर प्रदेशला ३८-२३ अशा फरकाने पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. अंतिम फेरी गाठण्यासाठी महाराष्ट्र संघासमोर हिमाचल प्रदेशच्या बलाढ्य संघाचे आव्हान असेल. ह्यहिमाचलचा संघ ताकदवान असला तरी या संघाला पुरून उरण्याची क्षमता आमच्यात आहे. आम्ही राज्याला सुवर्णपदक नक्कीच जिंकून देऊ,’ अशा आत्मविश्वास मुलींच्या संघाची कर्णधार आणि स्टार खेळाडू सोनाली हेळवी हिने व्यक्त केला.क्रीडा संकुलातील बॅडमिंटन स्टेडियममध्ये कबड्डीच्या लढती सुरू आहेत. उत्तर प्रदेशविरुद्ध झालेल्या लढतीत सोनाली महाराष्ट्राच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने नेहमीप्रमाणे आक्रमक खेळ करीत १९ गुणांची कमाई केली. तिला मोलाची साथ देणाऱ्या आसावरी खोचरे हिनेही खोलवर चढाया करीत १० गुण घेतले.
मध्यंतराला २०-१४ अशी ६ गुणांची महत्त्वपूर्ण आघाडी घेणाºया महाराष्ट्र संघाविरुद्ध उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी काही चांगल्या चाली रचल्या. मात्र, महाराष्ट्र संघसमोर आव्हान उभे करण्याइतपत त्या पुरेशा नव्हत्या. उत्तरार्धात आणखी ९ धावांची आघाडी घेत महाराष्ट्राने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
मध्यंतराला एक मिनिट शिल्लक असताना यजमान संघाने उत्तर प्रदेशवर पहिला लोन चढवला. सामना संपायला काही सेकंद उरले असताना या संघाने दुसरा लोन चढवताच उपस्थित महाराष्ट्राच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.उपांत्य फेरीत महाराष्ट्र संघसमोर हिमाचल प्रदेशचे तर हरियाणासमोर आंध्रप्रदेश संघाचे आव्हान असेल.