मुंबई : आमदार चषक व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने प्रभादेवीच नव्हे तर अवघ्या मुंबईकरांना प्रो कबड्डीच्या स्टार खेळाडूंचा आणि दिग्गज संघांचा खेळ आणि थरार अनुभवण्याची संधी लाभणार आहे. प्रभादेवीचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शिवसेना शाखा क्र. 194 यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत 26 ते 30 एप्रिलदरम्यान 12 व्यावसायिक संघांमध्ये रंगणाऱया आमदार चषक स्पर्धेत कबड्डीचा आंतरराष्ट्रीय थाट पाहायला मिळणार असून यात कबड्डीचे सामने वेळेवर सुरू करून वेळेत संपविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर सामने वेळेत सुरू करून उद्घाटनाची लांबलचक औपचारिकता मर्यादित केली जाणार आहे.
दोन महिन्यानंतर प्रथम रिशांक मैदानातमुंबईत झालेल्या फेडरेशन चषक स्पर्धेनंतर प्रथमच महाराष्ट्राचा स्टार खेळाडू आणि कर्णधार रिशांक देवाडिगा मैदानात उतरणार आहे. तो बलाढ्य भारत पेट्रोलियमचे प्रतिनिधित्व करत असून नितीन मदने, विशाल माने, मनिंदर सिंग आणि काशिलिंग आडकेसारख्या जबरदस्त खेळाडूंमुळे आमदार चषक स्पर्धेची चुरस आणखी वाढली आहे. प्रत्येक संघांत दिग्गज खेळाडू असल्यामुळे प्रभादेवीकरांना एक जोरदार आणि दिमाखदार स्पर्धा पाहायला मिळणार हे निश्चित. एकंदर 12 संघाच्या या स्पर्धेत चार गट पाडण्यात आले असून अ गटात महिंद्रा आणि महिंद्रा, मध्य रेल्वे, देना बँक, ब गटात नाशिक आर्मी, एअर इंडिया आणि मुंबई बंदर, क गटातून बीईजी पुणे, महाराष्ट्र पोलीस, बँक ऑफ इंडिया आणि ड गटातून आयकर (पुणे), भारत पेट्रोलियम व युनियन बँक हे संघ एकमेकांशी भिडतील. प्रत्येक गटातून दोन संघ बाद फेरीत धडक मारतील.
शिस्तप्रिय संघांचा गौरव, बेशिस्तांवर कारवाईकबड्डी संघांना आणि खेळाड़ूंना शिस्त लागावी म्हणून स्पर्धेत प्रत्येक सामना वेळेवर सुरू केला जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन न करताच बरोबर सायंकाळी 6 वाजता स्पर्धेचा उद्घाटनीय सामना सुरू होईल. जो संघ वेळेवर मैदानात दाखल होणार नाही, अशा संघावर कठोर कारवाई केली जाईल. बेशिस्त संघाला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवायलाही मागेपुढे पाहिले जाणार नाही. त्याचप्रमाणे पंचांशी गैरवर्तन करणाऱया खेळाडूवरही कारवाई केली जाणार आहे.
लाखोंची बक्षीसे, सर्वोत्तम खेळाडूला दुचाकीआमदार चषक स्पर्धेत दिग्गज संघात लढत होत असल्यामुळे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणाऱया दोन्ही संघांना लखपती केले जाणार आहे. अंतिम विजेता संघ झळाळत्या आमदार चषकासह एक लाख 51 हजार रूपयांचा मानकरी ठरेल तर उपविजेता एक लाखाचा पुरस्कार जिंकू शकेल. त्याचबरोबर उपांत्य फेरीत पराभूत संघांनाही प्रत्येकी 51 हजार रूपयांचे इनाम दिले जाईल. एवढेच नव्हे तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूला एक सुंदर दुचाकी दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे सर्वोत्तम चढाई बहाद्दर, पकडपटू यांनाही आकर्षक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
संघांना सकस आहार, प्रेक्षकांना अल्पोपहारआंतरराष्ट्रीय दर्जाच्या कबड्डीचा जो थाट असतो, जो झगमगाट असतो, तो सारा प्रभादेवीच्या आमदार चषक स्पर्धेत पाहायला मिळेल. आजवर स्पर्धेदरम्यान संघांना सर्व सोयीसुविधा पुरवल्या जातात. त्यांची काळजी घेतली जाते. इथे सर्व संघांना सामन्यापूर्वी सकस आहार दिला जाणार आहे. त्याचबरोबर प्रभादेवीत प्रेक्षकांचीही तेवढीच काळजी घेतली जाणार असून त्यांना पिण्याचे पाणी आणि अल्पोपहारही ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कबड्डी सामन्यांचा मनमुराद आनंद लुटणाऱया हजारो कबड्डीप्रेमींपैकी एका भाग्यवंताला दररोज एक अत्याधुनिक सायकल बक्षीस रूपाने दिली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.