चेन्नई : प्रो कबड्डी लीग 2018च्या पहिल्या महाराष्ट्र डर्बीत चुरशीचा खेळ पाहायला मिळाला. यू मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यातील सामना निर्धारित वेळेत ३२-३२ असा बरोबरीत सुटला.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांकडून जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. यू मुंबाने पिछाडीवरून मुसंडी मारताना सामन्याचे चित्र हलते ठेवले. त्यांनी तोडीसतोड खेळ केला. यू मुंबाने लोण चढवत १७-१४ अशी आघाडी घेतली. यू मुंबाच्या सिध्दार्थ देसाईने सर्वाधिक ९ गुण घेतले. यू मुंबाने पहिल्या सत्रात २०-१८ अशी अवघ्या दोन गुणांची आघाडी घेतली. पुण्याच्या नितीन तोमरने (९) तोडीस तोड खेळ केला.
मध्यंतरानंतरही दोन्ही संघांमधील चुरस कायम दिसली. यू मुंबाने आघाडी कायम राखण्यावर भर देण्याची रणनीती अवलंबली. सिध्दार्थने त्याचा झंझावात दुसऱ्या सत्रातही कायम राखला. त्याला पुण्याचा नितीन सडेतोड उत्तर देत होता. अखेरच्या दहा मिनिटापर्यंत यू मुंबाकडे २७-२५ अशी आघाडी कायम होती. त्याच जोरावर यू मुंबाने ३२-३० अशी आघाडी घेतली होती. मात्र अखेरच्या चढाईत यू मुंबाच्या खेळाडूची पकड करून पुण्याने सामना ३२-३२ असा बरोबरीत सोडवला.