मुंबई : प्रो कबड्डी लीग 2018च्या सहाव्या पर्वाला रविवारी दणक्यात सुरूवात झाली. गतविजेत्या पाटणा पायरेट्सला सलामीच्या लढतीत तमिळ थलायव्हाजने सहज नमवले, तर यू मुंबा आणि पुणेरी पलटन यांच्यातील सामना अखेरच्या चढाईत 32-32 असा बरोबरीत सुटला. या पर्वासाठी मे महिन्यात लिलाव झाला आणि बऱ्याच खेळाडूंची अदलाबदल झाली. त्यामुळे प्रत्येक संघ नवी संघबांधणी करून मैदानावर उतरणार आहे. याचबरोबर प्रो कबड्डीच्या मागील पाच पर्वात न घडलेल्या घटना सहाव्या पर्वात पाहायला मिळणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या पाच गोष्टी...
सहा करोडपती खेळाडूमोनू गोयत ( हरयाणा स्टीलर्स), राहुल चौधरी ( तेलुगु टायटन्स), दीपक हुडा ( जयपूर पिंक पँथर्स), नितीन तोमर (पुणेरी पलटण), रिषांक देवाडिगा ( यूपी योद्धा) आणि फझल अत्राची ( यू मुंबा) या पाच खेळाडूंसाठी संघांनी कोट्यवधी रुपये मोजले. प्रो कबड्डीच्या एका पर्वात सहा करोडपती खेळाडू खेळण्याची ही पहिलीच वेळ.
अनुप कुमार करणार जयपूर पिंक पँथर्सचे नेतृत्वप्रो कबड्डीतील सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून अनुप कुमार याची ओळख आहे. त्याने मागील पाच पर्वात यू मुंबाचे नेतृत्व सांभाळले होते, परंतु यंदा यू मुंबाने त्याला संघाबाहेर केले. जयपूर पिंक पँथर्सने त्याला संघात घेत कर्णधार पदाची जबाबदारी दिली आहे.
बचावपटूंची खतरनाक जोडीप्रो कबड्डीतील सर्वात यशस्वी बचावपटूंची जोडी सुरेंदर नाडा व मोहित छिल्लर प्रथमच वेगवेगळ्या संघाकडून खेळणार आहे. ही जोडी आत्तापर्यंत यू मुंबा, बेंगळुरु बुल्स आणि हरयाणा स्टीलर्स या संघांकडून एकत्रित खेळली आहे. मात्र यंदा सुरेंदर नाडा हरयाणाकडून, तर मोहित छिल्लर जयपूर पिंक पँथर्सकडून खेळणार आहे.
मनजीत छिल्लर प्रथमच कर्णधाराच्या भूमिकेत नाहीयशस्वी अष्टपैलू असलेला मनजीत छिल्लर सहाव्या सत्रात कर्णधाराच्या भूमिकेत दिसणार नाही. मनजीतने पहिल्या व दुसऱ्या सत्रात बेंगळुरु बुल्सचे कर्णधारपद भुषविले होते. 3 व 4 सत्रात तो पुणेरी पलटनचा कर्णधार होता आणि मागील पर्वात त्याने जयपूर पिंक पँथर्सचे नेतृत्व सांभाळले होते. यंदा अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली तो तमिळ थलायव्हाज संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
जस्वीर सिंगने जयपूर पिंक पँथर्सची साथ सोडलीमागील पाचही पर्वात जयपूर पिंक पँथर्सचा हुकमी खेळाडू असलेला जस्वीर सिंग यंदा तमिळ थलायव्हाज संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसत आहे. जस्वीरने पहिल्या सत्रात 15 सामन्यांत 113 गुण आणि दुसऱ्या सत्रात 13 सामन्यांत 74 गुण कमावले होते. त्यानंतर त्याच्या कामगिरीचा आलेख उतरता राहिला.