- किशोर बागडे नागपूर : सिनेस्टार अभिषेक बच्चन याच्या मालकीचा जयपूर पिंक पँथर्स आणि तामिळ तलायवा संघांनी प्रो- कबड्डीच्या पाचव्या पर्वात गुरुवारी अखेर पहिल्या विजयाची चव चाखली. सलामी लढतीत दबंग दिल्लीकडून पराभूत झालेल्या जयपूरने ‘अ’ गटात आज पुणेरी पलटणचा ३०-२८ असा दोन गुणांनी निसटता पराभव केला. ‘ब’ गटाच्या सामन्यात दोन पराभवानंतर तामिळ तलायवाने यजमान बंगळुरूबुल्सचा २९-२४ असा पाच गुणांनी पराभव केला. बंगळुरू संघ सात सामन्यांत प्रत्येकी तीन विजय आणि पराभवांसह अव्वल स्थानावर असला, तरी विजय मिळविण्याची संधी गमविल्याचा पुढे फटका बसण्याची शक्यता आहे. मध्यांंतराला तलायवाने बंगळुरूवर १२-८ अशी आघाडी मिळविली होती.विजयी संघातील के. प्रांजनन याने सहा, तर नितीन हुड्डा आणि अमित कुमार यांनी प्रत्येकी चार गुणांची कमाई केली. पराभूत बंगळुरूकडून कर्णधार रोहितकुमारने १२, रवींदरने चार आणिण आशिषने चार गुणांची भर घातली. पण, अखेरच्या दोन मिनिटांत चार गुण दिल्यामुळे बुल्सला पराभव पत्करावा लागला. तलायवाचा कोरियन खेळाडू डॉन जियॉन ली सामन्याचा मानकरी ठरला.त्याआधी झालेल्या पहिल्या सामन्यात अखेरच्या दोन मिनिटांत अतिशय चुशीच्या खेळात पुण्याने बरोबरी साधण्याचा प्रयत्नकरताना रंगत आणली होती. पण, दोन गुणांची पिछाडी भरून काढणे न जमल्याने पहिले दोन्ही सामने जिंकणाºया पुण्याची विजयाची हॅट्ट्रिक हुकली.विजयी जयपूरकडून सामनावीर ठरलेला कर्णधार मनजीत चिल्लरने सर्वाधिक नऊ गुण खेचून आणले. जसवीरने पाच आणि तुषार पाटीलने चार गुणांचे योगदान देत कर्णधाराला समर्थ साथ दिली. पराभूत पुण्याच्या संघातील संदीप नरवाल याने सर्वााधिक ९ गुण नोंदवूनदेखील संघ पराभूत झाल्याने त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले. रोहित चौधरीने चार आणि रवीकुमार तसेच कर्णधार दीपक हुड्डा यांनी प्रत्येकी दोन गुण नोंदविले. पुण्याचा संघ प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या पकडी करण्यात कमकुवत ठरला. शिवाय, पुणे संघ पँथर्सकडून एकदा ‘आॅल आऊट’ ही झाला.दरम्यान, मनजीत चिल्लरने पीकेएलमधील उत्कृष्ट पकडीतील स्वत:चे २०० गुणदेखील पूर्ण केले. पुणे संघाने वर्चस्वपूर्ण चढाया आणि दमदार पकडी करीत ६-३ अशी आघाडी संपादन केली. तथापि, पँथर्सचा तुषार पाटील याने दोन गुणांची कमाई करीत आघाडी कमी केली. पाठोपाठ कर्णधार मनजीत चिल्लरनेही दोन गुण खेचून आणताच ९-९ अशी बरोबरी झाली. जसवीरसिंग आणि मनजीत यांनी चढाईतून आणखी गुण खेचून आणताच माघारलेल्या जयपूरने मध्यांतरापर्यंत पुणे संघावर १४-११ अशी तीन गुणांची आघाडी घेतली होती.विजयानंतर पँथर्सचा कर्णधार मनजीत चिल्लर म्हणाला, ‘सलग दोन सामने जिंकल्याने पुणे संघ आत्ममुग्ध झाला होता. आम्ही त्याचा लाभ घेतला. सामन्यातील डावपेच कोच भास्करन यांनी आखले होते. आम्ही ते यशस्वी केले.’ नागपुरातील सामने संपल्यानंतर आता कबड्डीचा हा थरार आज शुक्रवारपासून अहमदाबाद शहरात रंगणार आहे.
प्रो-कबड्डी : पिंक पँथर्स, तलायवाने उघडले विजयाचे खाते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:50 AM