- किशोर बागडे
नागपूर : उत्कृष्ट पकडी करणा-या दबंग दिल्लीला चढाईत गुण खेचण्यात वारंवार अपयश आल्यामुळे यू मुम्बाने शनिवारी प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात दुस-या विजयाची नोंद केली. दबंगचा चार सामन्यांत तिसरा पराभव होता. पीकेएलच्या पहिल्या पर्वात मुम्बाविरुद्ध पहिला सामना जिंकणा-या दबंगला त्यानंतर मात्र मुम्बाला पराभूत करता आले नाही. आजही त्यांना अपयशच आले. मुुुुंबईने हा सामना ३६ विरुद्ध २२ असा जिंकला.विभागीय क्रीडा संकुलात ‘अ’ गटाच्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत १४-८ अशी आघाडी मिळविणाºया मुम्बाचे खेळाडू उत्तरार्धात दिल्लीवर पूर्णपणे वरचढ दिसले. मुम्बाने पकडी आणि चढाईतून प्रत्येकी १५, तसेच प्रतिस्पर्धी दिल्लीला दोनदा ‘आॅलआऊट’ केल्याबद्दल चार गुण संपादन केले. कर्णधार अनूप आणि शब्बीर बापू यांनी ७-७ गुणांची कमाई केली, तर सुरेशने चार आणि कुलदीपसिंगने तीन गुणांची भर घातली. प्रतिस्पर्धी दिल्लीचा कर्णधार नीलेश शिंदे याने पाच व एस. श्रीरामने तीन गुण मिळविले. अनूप कुमार ‘बेस्ट रेडर’ तर दिल्लीचा नीलेश शिंदे सामन्याचा मानकरी ठरला. वैयक्तिक पुरस्कार शब्बीर बापू याला देण्यात आला.सामन्याच्या सुरुवातीपासून शब्बीर बापू, सुरेश कुमार, कर्णधार अनूप कुमार आणि सुरिंदर यांच्या दमदार चढाईच्या बळावर पहिल्या सात मिनिटांत मुम्बाने दबंगवर लोण बसवून ७-२ अशी आघाडी संपादन केली. सुरिंदरच्या सोबतीने कर्णधार अनूपने दिल्लीच्या चढाईपटूंची चांगलीच कोंडी करीत आघाडी १३-३ अशी केली. थोड्याच वेळात दबंगने चार पकडी करीत गुणसंख्या वाढविल्याने मध्यंतराला मुम्बाकडे १४-८ अशी आघाडी होती. मुम्बाने चढाईतून सहा आणि पकडीतून चार गुणांची कमाई केली.पाचव्या पर्वात यू मुम्बाची सुरु वात फारशी चांगली झाली नव्हती. पुणेरी पलटणकडून मुम्बाला पराभवाचा सामना करावा लागला होता.आजच्या सामन्यात सुरिंदरचा पहिल्या सात जणांत समावेश करण्यात आला आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत बचावात तीन पॉर्इंट मिळवले. त्याने दबंगच्या रेडर्सना बुचकळ्यात पाडले. या टॅकलनंतर कर्णधार अनूपकुमारनेही सुरिंदरला आलिंगन देत दाद दिली.