पुणे : मोनूचा अष्टपैलू खेळ आणि रवी कुमारचे भक्कम संरक्षण या जोरावर पुणेरी पलटन संघाने प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या सत्रात जयपूर पिंक पँथरचा २९-२५ असा पाडाव केला. यासह पुणेकरांनी ‘अ’ गटात २० गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. अन्य लढतीत गतविजेत्या पटना पायरेट्सला तेलगू टायटन्सविरुद्ध ३१-३५ असा पराभव पत्करावा लागला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या लढतीत पुणे आणि जयपूर संघांनी तोडीस तोड खेळ करताना सामना चुरशीचा केला. मध्यंतराला पुणेकरांनी १३-१२ अशी नाममात्र आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण राखले. यावेळी जयपूरकडून पुनरागमनाची अपेक्षा होती. मोनू, संदीप नरवाल, अक्षय जाधव आणि नितीन तोमर यांच्या आक्रमक खेळासह रवी कुमारच्या भक्कम पकडींच्या जोरावर पुण्याने सामन्यात घेतलेली आघाडी आघाडी अखेरपर्यंत टिकवत बाजी मारली. जयपूरकडून दीपक हुडाने ८ गुण मिळवताना एकाकी झुंज दिली.
तत्पूर्वी तेलगू टायटन्सने बलाढ्य पटना पायरेटसचे आव्हान ३५-३१ असे परतावले. विशाल भरद्वाज व अबोझार मिघानी यांनी प्रत्येकी ११ गुणांची जबरदस्त कमाई करत तेलगू संघाला विजयी केले. या दोघांच्या पकडीपुढे पटनाचा हुकमी खेळाडू ‘डुबकी किंग’ प्रदीप नरवालही अपयशी ठरला. यासह चढाईमध्ये स्टार राहुल चौधरीने ७ गुणांची वसूली करत पटनाच्या आव्हानातली हवा काढली.