किशोर बागडे नागपूर : होमग्राऊंडवर विजयी सलामी दिल्यानंतर दोन पराभव आणि एक बरोबरी अशी फारशी चांगली कामगिरी न करणाऱ्या बंगळुरू बुल्सचा प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात बुधवारी अखेर सूर गवसला. या संघाने विभागीय क्रीडा संकुलात स्थानिक चाहत्यांच्या उत्साहाचा लाभ घेत बंगाल वॉरियर्सवर ३१-२५ अशा फरकाने पराभव केला. सलामीला दोन्ही लढतीत विजय नोंदविणाºया वॉरियर्सचा हा पहिलाच पराभव ठरला.ब गटाच्या या सामन्यात मध्यंतरापर्यंत बुल्सने वॉरियर्सवर १२-१० अशी निसटती आघाडी संपादन केली होती. उत्तरार्धात अजय कुमारच्या उत्कृष्ट चढाईच्या बळावर संघाने गुणांमध्ये चांगलीच भर घातली. युवा आशिष कुमारने त्याला भक्कम साथ देत तब्बल पाच पकडी केल्या. कर्णधार रोहित कुमारने सहा तर महिंदरसिंग आणि रविंदरसिंग यांनीही प्रत्येकी दोन गुणांची भर घालून बुल्सचा विजय निश्चित केला.प्रतिस्पर्धी बंगाल संघाचा कोरियाचा चढाईपटू जँग कून ली याने आठ गुण संपादन केले खरे, पण उत्तरार्धात त्यांचा खेळ ढेपाळल्याने संघाला पराभव पत्करावा लागला. कर्णधार सुरजितसिंग आणि विनोद कुमार यांना गुण खेचून आणण्यात अपयश आले. बुल्सच्या बचावफळीने या दोघांचीही कोंडी केल्याने त्यांना केवळ क्रमश: चार आणि दोनच गुण मिळविता आले. आजच्या विजयानंतर बंगळुरू बुल्स ब गटात सहा सामन्यात तीन विजयांसह अव्वल स्थानावर विराजमान झाला तर पराभूत वॉरियर्स दोन विजय आणि एका पराभवासह तिसऱ्या स्थानावर आला.
बुल्सकडून वॉरियर्सची शिकार प्रो-कबड्डी : बंगालवर ३१-२५ ने शानदार विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:42 AM