हैदराबाद : यू मुम्बाने हरियाणा स्टीलर्सविरुद्ध अवघ्या एका गुणाच्या जोरावर २९-२८ असा विजय मिळवत यंदाच्या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली.काशिलिंग आडके व कर्णधार अनुप कुमार यांचा खेळ मुंबईसाठी निर्णायक ठरला.काशिलिंग, अनुप आणि युवा सुरींदर सिंग यांच्या जोरावर मुंबईने हरियाणाला धक्का दिला. १३व्या मिनिटापर्यंत आघाडी राखलेल्या मुंबईकरांना १४व्या मिनिटामध्ये गाठून हरियाणाने पुनरागमन केले. ही आघाडी त्यांनी २८व्या मिनिटापर्यंत कायम राखली होती. परंतु, अनुपने दोन गुणांची कमाई करत हरियाणावर लोण चढवून मुंबईला २२-२० अशी आघाडीवर नेले. शिवाय काशिलिंगने केलेली सुपर रेड मुंबईला आघाडीवर नेण्यात निर्णायक ठरली.युवा खेळाडूंच्या उतावळेपणाचा मुंबईला फटका बसला आणि हरियाणाने पुनरागमन केले. अखेरच्या मिनिटाला वझिर सिंगने बोनस गुणासह एक गडी मारल्याने हरियाणाने २८-२९ असे पुनरागमन केले. परंतु, अनुभवी अनुपने अखेरची चढाई केवळ टच लाइन पार करून वेळ घालवला व मुंबईच्या पहिल्या विजयाची नोंद झाली. हरियाणाकडून विकास खंडोला, वझिर सिंग यांनी अपयशी झुंज दिली. तत्पूर्वी, अनुप, काशिलिंग यांनी अपेक्षित कामगिरी केली. सुरींदरनेही दमदार पकडी करत हरियाणाची कोंडी केली होती. परंतु, विकास खंडोला, सुरजित सिंग व वझिर सिंग यांनी हरियाणाला आघाडीवर नेले. (वृत्तसंस्था)
यू मुम्बाच्या विजयाचा श्रीगणेशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 2:28 AM