पुणे : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत यजमान पुणेरी पलटन संघाने आक्रमक यू मुंबा संघाची विजयी घोडदौड रोखण्याचा पराक्रम शनिवारी केला. प्रो कबड्डी लीगच्या पाचव्या सत्रात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये झालेल्या या अटीतटीच्या लढतीत पुणेरी पलटनने ३३-३२ अशी अवघ्या एका गुणाने सरशी साधली. १३ गुण वसूल करणारा स्टार रेडर नितीन तोमर पुण्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला. गिरीश इरनाक याने बचावाची बाजू समर्थपणे सांभाळत ६ उपयोगी गुण नोंदविले.या लढतीसाठी नितीन आणि गिरीश या पुण्याच्या स्टार खेळाडूंना रोखण्याची व्युहरचना यू मुंबा संघाने आखली होती. मात्र, प्रत्यक्ष मैदानावर त्यांची व्युहरचना पुण्याच्या शिलेदारांनी उधळून लावली. मुंबईचा यंदाच्या मोसमातील हा पहिलाच पराभव ठरला.या मोसमात जबरदस्त फॉर्मात असलेला मुंबईचा स्टार रेडर सिद्धार्थ देसाई याने लौकिकाला साजेसा खेळ करीत १५ गुण कमावले. मात्र, त्याला इतर खेळाडूंकडून अपेक्षित साथ लाभली नाही. पूर्वार्धात विजयी संघ १७-१२ने आघाडीवर होता. त्यानंतर यू मुंबाच्या खेळाडूंनी सामन्यात परतण्याचे जोरदार प्रयत्न केले. मात्र, यजमान संघाच्या खेळाडूंनी विजय निसटू दिला नाही.या विजयासह पुण्याने ७ सामन्यांत ४ विजय, २ पराभव आणि एका बरोबरीसह २५ गुण मिळवत ‘अ’ गटातून अव्वल स्थान कायम राखले. ५ सामन्यांत ३ विजय १ पराभव आणि १ बरोबरी अशा कामगिरीसह १९ गुण प्राप्त करणारा यू मुंबा संघ दुसऱ्या स्थानी आहे.
पुणेरी पलटनने रोखली यू मुंबाची विजयी घोडदौड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 2:17 AM