कल्याण : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील लहान मुलांवर तातडीने उपचार करण्यासाठी भाजपाचेखासदार कपिल पाटील यांनी १ कोटी रुपयांचा खासदार निधी दिला आहे. या निधीतून कल्याण येथील वसंत व्हॅली मॅटर्निटी होममध्ये एनआयसीयू, पीआयसीयू यांच्यासह १५ बेडचे बालरुग्ण हॉस्पिटल तयार केले जाणार आहे.
कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कोविड संदर्भातील उपाययोजनांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार निधीचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार खासदार कपिल पाटील यांनी कल्याण येथे लहान मुलांसाठी अद्ययावत रुग्णालय तयार करण्यासाठी निधी दिला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना खासदार निधी मंजूर करण्यासाठीचे पत्र खासदार पाटील यांनी पाठविले आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात केवळ लहान मुलांवर उपचार करण्यासाठी विशेष सरकारी हॉस्पिटल उपलब्ध नाही. एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण आल्यास सरकारी व महापालिकेच्या रुग्णालयांवर ताण येईल. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांवर उपचारासाठी यंत्रसामग्री खरेदी केली जात आहे. त्यासाठी खासदार पाटील यांनी निधी दिल्यामुळे कल्याणमध्ये १५ बेडचे स्वतंत्र अद्ययावत बालरुग्ण हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. दरम्यान, कोविडच्या पहिल्या लाटेत खासदार पाटील यांनी एक महिन्याचा पगार पीएम केअर्स फंडाला देण्याबरोबरच, कोविडवरील उपाययोजनांसाठी १ कोटी रुपयांचा निधी प्रदान केला होता.