कल्याण- रेल्वे प्रवाशांच्या माेबाईलची चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. २४ तासता ११ मोबाईल चोरीला गेल्याची घटना कल्याण आणि शहाड रेल्वे स्थानकात घडली. कल्याण रेल्वे पोलिसांनी २४ तासांच्या आत सात चोरट्यांना अटक केली आहे. या सात आरोपींकडून ११ मोबाईल हस्तगत केले आहेत.
काल दिवसभरात कल्याण रेल्वे स्थानकात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केला. १० प्रवाशांचे मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली. तर शहाड रेल्वे स्थानकात एका प्रवाशांचा मोबाईल काल चोरीला गेला. कल्याण रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक मुकेश ढगे यांनी तपासाची चक्रे फिरविली. काही तासातच पोलिसांच्या पथकाने सात मोबाईल चोरट्यांना अटक केली. अटक केलेल्या चोरट्यांकडून ११ मोबाईल जप्त केले आहेत.
पोलिस अधिकारी प्रमाेद देशमुख यांच्या पथकाने ही कामगिरी केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अहमद शेख, विशाल काकडे, मोहम्मद हसन अन्सारी, सरजील अन्सारी, सचिन गवळी, मंगल अली शेख, संदीप भाटकर अशी आहेत. अटक करण्यात आलेले आरोपी हे सराईत चोरटे असून त्यांच्या विरोधात यापूर्वीही विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत.