कल्याण-कल्याण तालुक्यातील निंबवली गावात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव अनिश अनिल दळवी (१७) असे आहे. तो कल्याण मुरबाड राेडनजीक जूनियर कॉलेजमध्ये इयत्ता ११ वीच्या वर्गात शिकत होता.
अनिशने गैरवर्तन केल्याने कॉलेजने त्याच्यासह चार विद्यार्थ्यांना तुमचा दाखला घरी पाठवतो अशी ताकीद देत घरी पाठवून दिले होते. आपल्याला शाळेतून काढून टाकले जाईल या गोष्टीचा धसका अनिशने घेतला होता. तो काल बुधवारी घरी आला. त्याने घरी येऊन गळफास घेत आपले जीवन संपविले आहे. अनिशचा मृतदेह बुधवारी रात्री कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला होता. या ठिकाणी अनिशचे नातेवाईक उपस्थित होते.
त्यांनी सांगितले की, कॉलेजने अनिशला अपमानास्पद वागणूक दिली. एखादा मुलगा काही गैर प्रकार करतो तर त्याची माहिती कॉलेज व्यवस्थानाने पालकांना द्यायला हवी होती. अनिशसह अन्य तीन विद्यार्थ्यांनीही गैर प्रकार केला होता. त्या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून घेत घडला प्रकार सांगितला होता. अनिशच्या पालकांना काही एक सूचित करण्यात आले नाही. या प्रकरणात टिटवाळा पोलिस ठाण्यात अनिशच्या मृत्यूची नाेंदक आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे. पालकांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे टिटवाळा पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. या प्रकरणी कॉलेज प्रशासनाने अनिशच्या नातेवाईंकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. अनिशसह अन्य तीन विद्यार्थ्यांनी गैरकृत्य केले होते. त्यांच्याकडून पुन्हा गैरकृत्य होऊ नये यासाठी चौघांच्या कॉलेजमधून काढून टाकले जाईल अशी ताकीद दिली होती. त्यांना शिस्त लावण्यासाठी ही ताकीद दिली होती.