सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेला तगादा लावूनही भाडे दिले नसल्याच्या कारणास्तव धर्मदास दरबार संस्थेने कोरोना योद्धा १२ डॉक्टरांना सोमवारी रात्री खोली बाहेर काढल्याचा प्रकार उघड झाला. नगरसेवक अरुण अशान यांनी घटनास्थळी धाव घेऊन डॉक्टरांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था मध्य रात्री केली असून याप्रकारा बाबत संताप व्यक्त होत आहे. तर झालेल्या प्रकारा बाबत सविस्तर माहिती घेऊन कारवाई करण्याचे संकेत उपायुक्त मदन सोंडे यांनी दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्याने, कोरोना रुग्णाची संख्या आटोक्यात आली. कोविड रुग्णालयात, कोरोना आरोग्य सेंटर मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यां पासून कोरोनाचा संसर्ग दुसर्यांना हाऊ नये, म्हणून त्यांना धर्मादाय दरबार, हॉटेल आदी ठिकाणी ठेवण्यात आले. कॅम्प नं-३ मधील धर्मादाय दरबाराचा १० खोल्या महापालिकेने आरक्षित करून तेथेही काही डॉक्टरांना ठेवले. सर्वसुविधा असलेल्या एका खोलीचे दिवसाला ७०० रुपये भाडे असून एका खोलीत दोघेजण राहू शकतात. महापालिकेने मार्च, एप्रिल, मे महिण्याचे २ लाख ३६ हजार भाडे संस्थेला दिले. मात्र जून ते नोव्हेंबर असे ६ महिन्याचे भाडे महापालिकेकडे स्थगित असल्याने, संस्थेने भाडे देण्याचा तगादा लावला. नगरसेवक टोनी सिरवानी यांच्याकडे संस्थेचे राजू मोटवानी यांनी स्थगित भाड्या बाबत माहिती दिल्यावर, टोनी यांनी आयुक्तांना याबाबत कल्पना देऊन संस्थेचे भाडे देण्याची विनंती केली होती. आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची आश्वासन दिले होते.
महापालिकेला भाड्याबाबत वारंवार विनंती करूनही भाडे देत नसल्याच्या कारणास्तव सोमवारी रात्री १२ डॉक्टरांना खोली बाहेर काढले. याप्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली असून संस्थे बाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिवसेनेचे उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान यांनी रात्री धर्मदास दरबार येथे धाव घेऊन डॉक्टरांची डॉर्बीसह एक हॉटेलात राहण्याची व्यवस्था केली. अतिरिक आयुक्त करुणा जुईकर, उपायुक्त मदन सोंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी संस्था चालक राजू मोटवानी यांच्याकडे डॉक्टरांना राहू देण्याची विनंती केली. तसेच भाडे देण्याची तयारी दाखविली होती. मात्र संस्था चालकांनी भाडे देण्याचा पर्याय पुढे ठेवला. धर्मादाय संस्था, हॉटेल आदी ठिकाणी ४५ पेक्षा जास्त डॉक्टर, नर्स व संबंधित अधिकारी ठेवत असल्याची माहिती महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ दिलीप पगारे यांनी दिली आहे.
हॉटेलचे बिल वेळेवर संस्थेचे का नाही?
महापालिका कोरोना सेंटर व कोविड रुग्णालयात काम करणाऱ्या ४५ पेक्षा जास्त डॉक्टराणा हॉटेल व धर्मादाय संस्थे मध्ये सुरक्षित ठेवले जाते. हॉटेलचे बिल वेळेत मग धर्मदाय दरबार संस्थेचे का नाही? असा प्रश्न शहरात विचारला जात आहे. संस्थेला राजकीय हेतूने काहीजण बदनाम करीत असल्याची प्रतिक्रिया संस्था चालक राजू मोटवानी यांनी दिली. दरम्यान संस्थेचे पाणी जोडणी खंडित केल्याचा आरोप मोटवानी यांनी केला असून कोरोना योद्धा डॉक्टरांना राहण्यासाठी खोल्या दिल्याने, गुन्हा केला काय? असा प्रश्न केला.