डोंबिवली: कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा व चौथा रेल्वेमार्ग आणि चिखलोली येथील नियोजित रेल्वे स्थानक व परिसरातील जमिनी देणाऱ्या शेतकरी व भूखंडमालकांसाठी मुंबई रेलवे विकास कॉर्पोरेशन लि.ने (एमआरव्हीसी) सुमारे १३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उल्हासनगर येथील प्रांत अधिकाऱ्यांकडे निधी वर्ग करण्यात आल्यामुळे, रेल्वेच्या कामांना वेग येणार आहे. या संदर्भात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता.
शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली, ते पुढे म्हणाले की, कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा व चौथा रेल्वेमार्गासाठी कुळगाव, मोरिवली, चिखलोली, खुंटवली, कात्रप आणि बेलवली येथील शेतकरी व भूखंडमालकांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. तर अंबरनाथ-चिखलोली दरम्यान उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वेस्थानकासाठी स्थानकाच्या परिसरातील जमीन अधिग्रहीत करण्यात आली होती. या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नव्हता. या संदर्भात त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, `एमआरव्हीसी'ने चिखलोली स्थानक व परिसरातील जमिनीसाठी ८९ कोटी ४३ लाख, तर कल्याण-बदलापूरदरम्यानच्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वेमार्गासाठी ४५ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उल्हासनगर येथील प्रांत (उपविभागीय अधिकारी) यांच्याकडे निधी पाठविण्यात आला असल्याचे ते म्हणाले.