प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: येथील खोणी गावातील म्हाडा प्रोजेक्ट मधील बांधकाम पूर्ण झालेल्या १३ इमारतींमधील एकुण १५ लाख ३२ हजार १६० रूपयांची आर्थिंग केबल चोरीला गेल्याचा प्रकार ९ नोव्हेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान घडला होता. या गुन्हयाचा छडा लावण्यात मानपाडा पोलिसांना यश आले असून तिघांपैकी दोघा चोरटयांना पुणे जिल्हा, हवेली तालुक्यातील वारजे आणि कोथरूडमधून अटक केली. चंदु अप्पा शिंदे (वय २८ ) आणि भास्कर रवी महाडीक (वय २९ ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अन्य एकाचा शोध सुरू आहे.
खोणी गाव परिसरात म्हाडाच्या इमारती बांधण्याचे काम सुरु आहे. बांधकाम पूर्ण झालेल्या १३ इमारतींमधील सर्व मजल्यांवरील इलेक्ट्रीक डकचे लॉक तोडून, वायरींग करीता वापरलेले आतील पी.व्ही.सी पाईप जाळुन पॉलिकॅप कंपनीच्या आर्थिंग केबल चाेरण्यात आल्या होत्या. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक अविनाश वनवे, संपत फडोळ आणि प्रशांत आंधळे यांच्या पथकाने तपास सुरु केला. परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यात एक कार दिसून आली.
कारच्या नंबरवरून ती गाडी पुण्यातील असल्याची माहिती समोर आली. पुण्यात जाऊन मिळालेल्या माहितीनुसार दोन ठिकाणी पथकांनी छापा टाकला आणि दोघांना अटक केली. तिसरा आरोपी मात्र मिळून आला नाही. दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी म्हाडा प्रोजेक्टच्या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून सहा लाख ६४ हजाराची केबल वायर आणि कार असा १० लाख ६४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महिनाभर सुरू होती चोरी, पण...
महिनाभर म्हाडा प्रोजेक्टमधून माल चोरी केला जात होता पण याची कुणकुण कोणालाच कशी लागली नाही? याचीही माहिती पोलिस घेत आहेत. म्हाडाच्या प्रोजेक्ट संबंधित कोणी व्यक्ती या चोरटयांना सामिल आहे का या अंगाने देखील पोलिस तपास करीत आहेत.
साध्या वेशातील पथकांनी घेतली स्थानिक पोलिसांची मदत
तिन्ही आरोपींचा वावर पुणे शहरातील वारजे परिसरात असल्याची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांची पथके पुण्याला रवाना झाली. त्यांनी साध्या वेशात वारजे आणि कोथरूड पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये स्थानिक पोलिसांची मदत घेत पथकांनी दोन ठिकाणी सापळे लावले होते.