डोंबिवली - रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन तर्फे जागतिक श्वान दंश दिनानिमित्त जनजागृती रॅली श्री गणेश मंदिर येथून काढण्यात आली. संस्थेच्या माध्यमातून १७ ते २३ सप्टेंबर या मुदतीत डोंबिवलीत विविध ठिकाणी जाऊन अँटीरेबीज लस १५८४ इतक्या भटके कुत्रे, मांजर यांना देण्यात आली.
रॅलीच्या निमित्ताने श्री गणेश मंदिर सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी पशूवैद्यक संघटना, महात्मा गांधी विद्यामंदिर, प्रकाश विद्यालय, इंटरॅक्टर्स, रोटरॅक्टर्स, श्वानमित्र, प्राणीमित्र, श्वान निर्बीजीकरण केंद्र कंडोमपा, एन एस एस युनिट - प्रगती महाविद्यालय, एम.के.एम पटेल कॉलेज या संस्थांनी सहभाग घेतला होता. चर्चा सत्रात प्रथम या सहभागी सदस्यांनी आपले अनुभव व विचार मांडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, कंडोमपा या होत्या. त्यांच्या हस्ते श्वान आणि इतर प्राणी,पक्षी यासाठी मदत करणाऱ्या नागरिक, संस्था, कॉलेज इत्यादींचा रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन यांच्यातर्फे कार्याचा गौरव करण्यात आला.
त्यावेळी शुभारंभाला रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचे प्रोजेक्ट अध्यक्ष, पशूवैद्यक डॉ. मनोहर अकोले यांनी या रॅली आणि चर्चा विषयी तसेच श्वान दंश बाबत समज,गैरसमज याविषयी माहिती सांगितली. तसेच डोंबिवलीत निर्बीजीकरण केंद्र सुरू करणे आणि पाळीव श्वानधारंकासाठी परवाना पद्धत चालू करणे अशी मागणी डॉ. अकोले यांनी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊन आणि पशूवैद्यक संघटनेच्या वतीने केली.
त्याबाबतचे निवेदन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, यांना देण्यात आले. त्यांनीही संस्थेच्या मागणीची पूर्तता लवकरच करण्यात येईल, तसेच भटक्या कुत्र्यांचे प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन दिले. त्यावेळी मिडटाऊन संस्थेचे अध्यक्ष अजय कुलकर्णी, सचिव किशोर अढळकर आदी उपस्थित होते. डॉ. मकरंद गणपुले यांनी सूत्र संचालन केले. आभार प्रदर्शन प्रदीप बुडबाडकर यांनी केले. शेवटी पसायदान होऊन त्या कार्यक्रमाचा समारोप झाला.