यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 5 महिन्यांत म्हणजेच अवघ्या 150 दिवसांमध्ये पालिकेच्या तिजोरीमध्ये मालमत्ता करापोटी तब्बल 160 कोटी 64 लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम एप्रिल ते ऑगस्ट महिन्यात रोख,ऑनलाइन किंवा चेकच्या माध्यमातून भरणाऱ्यांना 5 टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कर भरणा झाल्याचे केडीएमसीतर्फे सांगण्यात आले.
गेल्या वर्षी याच 5 महिन्याच्या काळात 110 कोटींचा कर जमा झाला होता. यावर्षी त्यामध्ये 50 कोटींची भर पडली असून सरासरी दिवसाला 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक कर जमा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी जमा होणारी कराची रक्कम हा महत्वाचा घटक असतो. यातूनच शहराच्या विकासाची आखणी केली जात असते. गेल्या वर्षीही करदात्यांकडून केडीएमसीच्या तिजोरीत विक्रमी कर भरण्यात आला होता.
वर्षाच्या सुरुवातीलाच केडीएमसीने नव्याने लागू केलेल्या 600 रुपये स्वछता करावरून भरपूर टिका झाली होती. अनेक राजकीय पक्षांनी या कराला तीव्र विरोध करत हा कर न भरण्याचे आवाहन केले होते. परंतु त्या आवाहनानंतरही केडीएमसीच्या तिजोरीमध्ये कोट्यवधींचा कर जमा झाल्याचे दिसून येते. एकीकडे कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटली असली तरी केडीएमसीसाठी हा कोवीड काळ आर्थिकदृष्ट्या चांगलाच लाभदायक ठरल्याचे करांपोटी तिजोरीत जमा झालेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.