अनिकेत घमंडी, डोंबिवली: पर्यावरण दक्षता मंडळातर्फे पर्यावरण शाळे अंतर्गत शहरातील शाळांमधून पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती हा उपक्रम घेण्यात आला. त्यामध्ये साधारण १७२६ विद्यार्थी आणि ४५ शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले. त्या उपक्रमामध्ये डोंबिवलीतील स्वच्छ डोंबिवली अभियान, ऊर्जा फौंडेशन, श्री लक्ष्मी नारायण संस्था या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना गणपती सण पर्यावरण पूरक पद्धतीने साजरा करताना मूर्ती, सजावट, विसर्जन, निर्माल्याची व्यवस्था, तसेच एकल वापर उत्पादनांमुळे होणारी पर्यावरणाची हानी अशा सर्व मुद्दयांवर सखोल चर्चा करून उपाययोजनेविषयी माहिती सोमवारी मंडळाच्या रूपाली शाईवाले यांनी दिली. सण साजरा करताना विविध प्रकारे जलस्त्रोतांचे, मातीचे, तसेच ध्वनी चे प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी पर्यावरण स्नेही पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक ठरते. सणाच्या प्रत्येक घटकाचे पर्यावरण पूरक पर्याय काय असू शकतात या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.उपस्थित विद्यार्थ्यांना कागदी निर्माल्य पिशवीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली. महानगरपालिकेच्या हिन्दी माध्यमिक विद्यालय, मोठा गाव शाळा, जिल्हा परिषद मानपाडा रोड शाळा, स. वा. जोशी विद्यालय,- टिळकनगर- विद्यालय, आचार्य भिसे शाळा, राजनिगंधा विद्यालय, दा . कृ . वाणी विद्यालय, श्री- गणेश विद्यामंदिर, स्वामी विवेकानंद अरुणोदय विद्यालय, प्रगती- महाविद्यालय ह्या डोंबिवली स्थित शैक्षणिक संस्था तसेच कल्याण मधील एम. के. महाविद्यालय, गजानन- विद्यालय, एम . जे. बी. के.- शाळा, सेंट्रल रेल्वे शाळा या संस्थामध्ये हा उपक्रम राबवण्यात आला.