लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: गिरणी कामगारांना घरांसाठी कल्याणच्या ग्रामीण भागातील रायते गावात ५६ एकरचा भूखंड प्रतिचौरस मीटर एक रुपया भाडेकराराने म्हाडाला देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे. याठिकाणी गिरणी कामगारांकरिता कायमस्वरूपी १९ हजार घरे देण्यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत घाम गाळलेल्या गिरणी कामगारांना तेथेच घरे देण्याच्या प्रयत्नांना अपयश आले असून, अखेर कोकण व घाटावरील या कामगारांना उपनगरात आसरा घ्यावा लागणार आहे.
या संदर्भात मुंबई गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस एकनाथ माने यांनी सांगितले की, गिरणी कामगारांचा प्रश्न तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारकिर्दीत चर्चेला आला होता. बहुतांश गिरणी कामगार हे काेकणातील आणि घाटावरचे रहिवासी असल्याने तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण यांनी गिरणी कामगारांना त्यांच्या मूळ गावी घरे देण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्याला गिरणी कामगारांचा विरोध होता. कोकणात आणि घाटावर घरे न देता मुंबईत आणि मुंबई उपनगरातच घरे दिली जावी, अशी मागणी त्याचवेळी गिरणी कामगारांनी केली होती.
आतापर्यंत केवळ १२०० गिरणी कामगारांना घरे
मुंबईतील गिरणी कामगारांचा १९८२ मध्ये मोठा संप झाला होता. संप चिघळल्याने गिरणी कामगार देशोधडीला लागले. संप झाला तेव्हा गिरणी कामगारांची संख्या जवळपास ७५ हजार होती. त्यानंतर गिरणी कामगारांच्या घरासाठी ज्या कामगारांनी दावा केला, त्यांची संख्या १ लाख ७५ हजार होती. आतापर्यंत केवळ १२०० गिरणी कामगारांना घरे मिळाली आहेत. कल्याणमध्ये गिरणी कामगारांसाठी १९ हजार घरे बांधली जाणार असतील तर मोठ्या संख्येने कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटू शकण्यास मदत होणार आहे.
घरकुल योजनेकरिता आरक्षण
- कल्याणमधील गौरी पाडा हा परिसर कल्याण- डोंबिवली महापालिका हद्दीत आहे. हेदूटणे हे गाव महापालिकेत समाविष्ट केलेल्या २७ गावांपैकी आहे. रायते हे गाव कल्याण ग्रामीणमध्ये समाविष्ट आहे.
- घरकुल योजनेकरिता अशा प्रकारचे आरक्षण विकास आराखड्यात आहे का, अशी विचारणा महापालिकेच्या सहायक संचालक नगररचना विभागाकडे केली असता, त्यांच्याकडून घरकुल योजनेकरिता आरक्षित भूखंड नसल्याचे सांगण्यात आले.