अजित मांडके/प्रशांत माने
ठाणे : लॉकडाऊनमुळे शहरातील वाहनांचा वेग मंदावला होता. त्याचा परिणाम पोलीस आयुक्तालयात अपघातांमध्ये या कालावधीत घट दिसून आली; मात्र अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आणि पुन्हा अपघातांत वाढ झाली. त्यानुसार मागील जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत पोलीस आयुक्तालयात ६६८ अपघात झाले असून, त्यामध्ये ८०४ जणांना दुखापत झाली आहे. यामध्ये १९२ जणांचा मृत्यू झाला.पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वाहतूक विभागामार्फत अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलीस आयुक्तालयात ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात, ती ठिकाणे ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
याठिकाणी अपघात कशा पद्धतीने कमी करता येऊ शकतात, यासाठी प्रयत्नही केले जात आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात आजच्या घडीला ३७ ब्लॅक स्पॉट असल्याची माहितीही यानिमित्ताने समोर आली आहे. दरम्यान, मागील वर्षभराची आकडेवारी पाहता, पोलीस आयुक्तालयात एकूण ६६८ अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये १९२ जणांना आपले प्राण गमवावे लागले. याच अपघातांमध्ये ३७८ जण गंभीर झाले असून, २३४ जणांना किरकोळ दुखापत झाली. २०१९ मध्ये पोलीस आयुक्तालयात ८७४ अपघात झाले असून, यामध्ये २११ जणांचा मृत्यू झाला आहे. ४९५ जणांना गंभीर, तर २९९ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. वर्षभरात १०११ जणांना दुखापत झाली.
कल्याण-डाेंबिवली शहरांमध्ये दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही दुरवस्था ‘जैसे थे’
‘नेमिची येतो पावसाळा’ या उक्तीनुसार पावसाळ्यात रस्त्यात खड्डे पडणारच हे गृहीत धरले जात असले तरी पावसाळ्यानंतरही खड्ड्यांचे चित्र कल्याण- डोंबिवलीत बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. खड्ड्यांसह रस्त्याच्या असमतोलपणामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असून दरवर्षी केडीएमसीकडून कोट्यवधी खर्च करूनही रस्त्यांची दुरवस्था ‘जैसे थे’ असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक कोंडीलाही हातभार लागत असून ज्यांच्यावर वाहतूक नियमाची जबाबदारी आहे त्या वाहतूक पोलिसांनाही योग्य त्या सुविधा महापालिकेकडून मिळत नसल्याने त्यांचीही फरपट होते. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते; परंतु रस्तेच सुस्थितीत नसतील आणि वाहतूक नियमन करणाऱ्यांना सुविधाच मिळत नसतील तर असे कार्यक्रम राबवून काय साध्य होणार? असा सवाल एकूणच वास्तव पाहता उपस्थित होत आहे.
केडीएमसी क्षेत्रातील रस्त्यांची लांबी ५३२ किमी आहे. या पैकी ३८२ किलोमीटरचे रस्ते हे कल्याण डोंबिवली शहरातील तर उर्वरित १५० किलोमीटर रस्ते २७ गावांतील आहेत. यातील बहुतांश रस्ते डांबरीकरणाचे तर काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे आहेत. विकासकामांच्या निमित्ताने महापालिकेसह अन्य यंत्रणांनी वेळोवेळी केलेल्या खोदकामांमुळे पावसाळ्यानंतरही शहरातील काही प्रमुख रस्त्यांची आजच्या घडीला दयनीय अवस्था आहे. डोंबिवली निवासी भागासह ठाकुर्लीतील ९० फिट रोड आणि कल्याण- डोंबिवली रेल्वे समांतर रस्ता याचे ज्वलंत उदाहरण आहे. सुस्थितीत असलेल्या या रस्त्यांची सद्य:स्थितीला पुरती वाताहत झाली असताना शहरातील काँक्रिटीकरणाची कामेही योग्य प्रकारे झालेली नाहीत.