लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: बनावट कागदपत्रांच्या आधारे कल्याण-डोंबिवली पालिकेचा खोटा आराखडा तयार करून पालिकेची खोटी ओसी तयार केली. त्याआधारे आरक्षित जागेवर दहा मजली इमारत बांधून त्यातील सदनिका ग्राहकांना विकल्या. त्यामुळे एक कोटी ८२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर सलमान डोलारे याच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पश्चिम भागातील रेतीबंदर परिसरातील मौलवी कंपाउंडजवळ युसूफ हाईट्स नावाची दहा मजली बेकायदा इमारत उभारली. याप्रकरणी कचोरे परिसरातील निसार शेख यांनी बाजारपेठ पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शेख यांच्या तक्रारीच्या आधारे बिल्डर डोलारे याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पालिकेच्या विकास आराखड्यानुसार मौलवी कम्पाउंडजवळ बेघरांसाठी ३७६ चौरस मीटर तसेच ११५ चौरस मीटरचा भूखंड खेळाच्या मैदानासाठी आरक्षित आहे. या दोन्ही आरक्षित भूखंडावर ही इमारत उभारली आहे.
दहा जणांनी केली गुंतवणूक
२०१२ ते २०१४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. बिल्डरने साथीदाराच्या मदतीने बनावट कागदपत्रे तयार केली. पालिकेचा बनावट आरखडा तयार केला. तसेच ओसी तयार करून पालिकेची परवानगी मिळाल्याचे भासविले. १० मजली युसूफ इमारतीत दहा जणांनी गुंतवणूक केली. त्यांच्याकडून एक कोटी ८२ लाख रुपये उकळले.