डोंबिवली येथील पश्चिमेकडील कोपररोड सिद्धार्थनगर झोपडपट्टीला परिसरातील रेल्वेच्या जागेतील १२ फीट उंचीची जुनी संरक्षक भिंत अंगावर कोसळून दोन मजुरांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. नवीन संरक्षक भिंत उभारणीचे काम चालू असताना ही दुर्घटना घडली. जखमींवर केडीएमसीच्या शास्त्रीननगर रूग्णालयात उपचार सुरू असून यातील दोन गंभीर जखमींना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात हलविण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
ज्याठिकाणी ही दुर्घटना घडली त्या परिसरात १६ सप्टेंबरला तेथील अतिक्रमणावर कारवाई झाली होती. त्याठिकाणी नवीन संरक्षक भिंत बांधण्याचे १२ मजुरांकडून काम सुरू होते. काम चालू असताना त्याठिकाणी अस्तित्वात असलेली जुनी संरक्षक भिंत अचानक कोसळली आणि त्याच्या ढिगा-याखाली पाच मजूर अडकले तर अन्य मजूर सुखरूप बचावले. दरम्यान ही घटना घडताच सिध्दार्थनगर झोपडपट्टीतील तरूणांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील मजूरांना नजीकच्या शास्त्रीनगर रूग्णालयात दाखल केले. हे बचावकार्य करताना तरूणांना बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सळया लागून ते ही किरकोळ जखमी. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक विष्णूनगर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. उपचारादरम्यान मल्लेश चव्हाण (वय ३५) आणि बंडू गोवासे (वय ४५) या दोन मजुरांचा मृत्यू झाला तर विनायक चौधरी (४२), माणिक पवार (वय ६०), युवराज वेडगुत्तलवार (४५) अशा तीन जखमींवर उपचार सुरू आहेत. विनायक आणि युवराज यांची प्रकृती गंभीर आहे.
हलगर्जीपणा कारणीभूत
दरम्यान ज्याठिकाणी हे काम चालू होते त्याठिकाणी जूनी संरक्षक भिंत न तोडता त्याच्या लगतच नवीन बांधकाम सुरू केले जात होते. जून्या भिंतीलगतच खड्डा खणला जात होता. काम चालू असताना त्याचा धक्का जुन्या भिंतीला लागला आणि ती अंगावर कोसळल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट होत आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा समोर आला असून याप्रकरणी कंत्राटदार आणि सुपरवायझरविरोधात निष्काळजीपणाचा विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती डोंबिवलीचे सहाययक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी दिली.
मजूर मूळचे आंध्रचे
मजूर मूळचे आंध्र प्रदेशातील रहिवासी असून सध्या ते मुंब्रा, दिवा याठिकाणी रहायला होते. ज्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम चालू होते त्याठिकाणीच ते सध्या राहत होते अशी माहिती मिळत आहे.