कल्याण तालुक्यात मुंबई वडोदरा महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया करीत असताना तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी २०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप वकिल निलेश जाधव यांनी केला आहे. या प्रकरणी जाधव यानी एक व्हिडिओ क्लीप सादर केली आहे. या प्रकरणी प्रांत अधिकारी यांची चौकशी करुन त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान प्रांत अधिकाऱ्याने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
कल्याण परिसरात एका व्यक्तीचे बांधकाम मुंबई वडोदरा महामार्गात बाधित होत होते. त्याच्या नावाचा भूसंपादाचा २ कोटी ८ लाख रुपयांचा मोबदला मोहम्मद शाहीद मिठाईवाला यांच्या नावे दाखविला. या रक्कमेचा भूसंपादनाचा बोगस निवाडा करुन सरकारच्या रक्कमेचा अपहार केला आहे. मिठाईवाला यांनी त्यांचे बांधकाम बाधित होत नसल्याचे प्रांत अधिकाऱ््यांच्या निदर्सनास आणून दिले. ही रक्कम सरकारी खात्यात पुन्हा जमा करण्यात आली आहे. वकिल जाधव यांचा आरोप आहे की, मिठाईवाला लाभार्थी नसताना त्यांच्या नावे २ कोटी ८ लाख रुपयांचा भूसंपादनाचा निवाडा मंजूर केला. अशा प्रकारे प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी असंख्य भूसंपादनाचे निवाडे मंजूर केले असून जवळपास २०० कोटीचा भ्रष्टाचार केला आहे. या प्रकरणी वकिल जाधव यांनी मिठाईवाला आणि भांडे पाटील यांच्यातील संवादाची व्हिडिओ क्लिपही सादर केली आहे. या क्लिपमध्ये भांडे पाटील हे मिठाईवाला याला त्याचे नाव वापरल्याच्या बदल्यात ३५ लाख रुपयांचे आमिष दाखवित आहेत. भांडे पाटील यांची या प्रकरणी चौकशी करुन त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात यावे अशी मागणी जाधव यांनी केली आहे. दरम्यान जाधव यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात ऑगस्ट २०२३ मध्ये याचिका दाखल केली आहे. ही याचिका न्यायप्रविष्ट आहे.या प्रकरणी प्रांत अधिकारी भांडे पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित वकिल आणि मिठाईवाला यांनी केलेले आरोप निराधार आणि खोटे आहेत. मुंबई वडोदरा महामार्ग भूसंपादनाचे सर्व निवाडे कायदेशीर आहेत. मंजूर केलेले निवाडे नॅशनल हायवे प्राधिकरणाने तपासलेले आहेत.