कल्याण-सोमवारपासून शाळा सुरु होणार आहे. त्यासाठी शिक्षकांना कोविड चाचणी ही बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र नियोजनाच्या अभावामुळे कल्याणमध्ये एका कोविड सेंटरवर मोठय़ा प्रमाणात शिक्षक कोविड चाचणीकरीता जमा झाले. त्यामुळे कोविड सेंटर कर्मचा:यांची एकच तारांबळ उडाली. केवळ १०० किट असताना २०० पेक्षा जास्त शिक्षकांची चाचणी करणार असा प्रश्न सेंटर पुढे उभा ठाकला आहे.
दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर सोमवारपासून नववी ते १२ वी भरविले जाणार आहेत अशी घोषणा सरकारच्या शिक्षण खात्याने केल्यानंतर सर्व शिक्षकांसाठी कोविडची चाचणी ही बंधनकार करण्यात आली आहे. यासाठी ठिकठिकाणी शिक्षक कोविड चाचणी करुन घेत आहे. कल्याण पश्चिमेतील वसंत व्हॅली याठिकाणी महापालिकेचे कोविड सेंटर आहे. हे सेंटर एका खाजगी संस्थेकडून चालविले जात आहे. या कोविड सेंटरसमाोर शिक्षकांनी कोविड चाचणी करीता रांग लावली होती. सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने कोविड सेंटरमधील कर्मचारीही हैराण झाले अहेत. सकाळी सात वाजल्यापासून शिक्षकांनी रांग लावण्यास सुरुवात केली. चाचणीसाठी सेंटर ११ वाजता उघडले गेले. त्या दरम्यान शिक्षकांना त्रस सहन करावा लागला. या सेंटरमध्ये फक्त १०० कोविड टेस्ट किट उपलब्ध असल्याने २०० पेक्षा जास्त शिक्षक त्याठिकाणी चाचणीसाठी आले होते. त्यामुळे सगळयांची टेस्ट कशी करणार असा प्रश्न निर्माण झाला.