अनिकेत घमंडी, कल्याण/वसई/पालघर: दि. ११ डिसेंबर २०२३ तालुकास्तरावर शनिवारी (०९ डिसेंबर) आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीतून कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित तसेच वीजचोरीची दाखलपूर्व व प्रलंबित अशी २०८७ प्रकरणे तडजोडीद्वारे निकाली काढण्यात आली. महावितरणच्या उपलब्ध सवलतीचा लाभ घेत संबंधित ग्राहकांनी २ कोटी ६१ लाख रुपयांचा भरणा केला.
कल्याण परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या तसेच वीज चोरीची दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने सोडवण्यासाठी लोक अदालतीत ठेवण्यात आली होती. त्यानुसार २०८७ प्रकरणांमध्ये तडजोड होऊ शकली व २ कोटी ६१ रुपयांचा भरणा झाला. कल्याण मंडल एक अंतर्गत डोंबिवली, कल्याण पश्चिम व पूर्व विभागात १४६ ग्राहकांनी ५७ लाख ६५ हजार रुपयांचा भरणा करून आपल्या प्रकरणांचा निपटारा केला. तर कल्याण मंडल दोन अंतर्गत उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा, शहापूर भागातील १ कोटी ४७ लाख रुपयांचा भरणा करणाऱ्या ७८८ ग्राहकांची प्रकरणे सामोपचाराने मिटवण्यात आली. वसई मंडलांतर्गत वसई, विरार, वाडा, सफाळे येथील ४८६ ग्राहकांनी लोक अदालतीत सहभागी होत ३५ लाख ८० हजार रुपयांचा भरणा केला. तर पालघर मंडल कार्यालयांतर्गत पालघर, बोईसर, डहाणू, तलासरी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथील ६६७ ग्राहकांनी २० लाख ४३ हजार रुपये भरून आपली प्रकरणे निकाली काढली.
टिटवाळा उपविभागातील १७५ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ८८ लाख रुपयांचा भरणा झाला. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी टिटवाळ्याचे उपविभागीय अभियंता गणेश पवार आणि त्यांच्या टिमचे कौतुक केले. विधी सेवा प्राधिकरणासह मुख्य अभियंता औंढेकर, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, संजय खंडारे, दिलीप खानंदे, उपविधी अधिकारी दीपक जाधव, सहायक विधी अधिकारी सुहास बाराहाते, शिल्पा हन्नावार यांनी लोक अदालत यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.