कल्याण : ठाणे जिह्यातील पहिली पूर्ण मॅरेथॉन (४२ किलोमीटर) आयोजित करण्याचा मान कल्याणच्या रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याणला मिळाला. रविवारी पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे २२०० पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग घेतला होता.
पहाटे ३ वाजता ४२किमी, त्यानंतर २१किमी, १० किमी, ५ किमी व ३ किमी अशी स्पर्धा घेण्यात आली. या मॅरेथॉनचे विशेष आकर्षण म्हणजे, ‘व्हील चेअररन’. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले काही दिव्यांग व्हीलचेअरवर बसून ५ किमी धावले व त्यांनी आपल्या जिद्दीचे, चिकाटीचे आणि उमेदीचे दर्शन घडविले. या मॅरॅथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी ठाणे जिल्ह्याचे पुढील वर्षीचे प्रांतःपाल रो. हर्ष मकोळ व कल्याणचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण हे दिव्यांग बांधवांना कृत्रिम हात व पाय विनामूल्य बसवून देतात. तसेच चेकडॅम बांधणे, शाळा दत्तक घेणे, व्हिलचेअरचे मोफत वाटप, स्किल डेव्हलपमेंट व इतरही विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. त्याकरिता निधी संकलनासाठी दरवर्षी मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. नागरिक या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन कायम आमच्या पाठीशी उभे राहतात. त्यासाठी रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण त्यांची कायम ऋणी राहील अशी भावना रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण चे विद्यमान अध्यक्ष रो. कैलास देशपांडे यांनी व्यक्त केली.
मॅरेथॉन प्रकल्प प्रमुख रो. दिपक चौधरी यांनी ही मॅरेथॉन यशस्वी करण्यात हातभार लावणाऱ्या सर्वांचे यावेळी आभार मानले. मॅरॅथॉनच्या शेवटी विजेत्यांना पारितोषिक व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.