मुरलीधर भवार
कल्याण : केडीएमसी हद्दीत भटक्या कुत्र्यांकडून चावे घेण्याचे प्रमाण महिन्याला १,३३० इतके आहे. ते पाहता कुत्र्यांची दहशत कायम असल्याचे स्पष्ट होते. कुत्र्यांचा बंदोबस्तासाठी मनपाकडून केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या खर्चाच्या उपयुक्ततेवर यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
मनपाने वेट ॲनिमल या कंपनीला भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याचे कंत्राट दिले आहे. कंत्राटदाराचे कर्मचारी तक्रार येताच भटक्या कुत्र्यांना पकडून आणतात. नसंबंदी केल्यावर त्याला पुन्हा त्याच परिसरात सोडले जाते. कुत्र्यांची संख्या कमी होत असल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. पाच वर्षांत मनपाचा कुत्र्यांच्या नसबंदीवर ३ कोटी ७८ लाखांचा खर्च झाला आहे. मात्र, नागरिकांच्या मते भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे.
हजारो कुत्र्यांसाठी केवळ २० कर्मचारीमनपाने वेट ॲनिमल कंपनीला कुत्र्यांची नसबंदी करण्याचे काम दिले असून, या कंपनीकडे दोन गाड्या आहेत. या दोन गाड्यांवर प्रत्येकी पाच कर्मचारी असतात. नसबंदी केंद्रात केवळ पाच कर्मचारी आहेत. याशिवाय प्रत्यक्ष नसबंदी करणारे पशू वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व त्यांचे सहाय्यक असे मिळून केवळ २० कर्मचारी आहेत.
रोज येतात ५० तक्रारी भटके कुत्रे पकडून नेण्यासाठी विविध भागातून रोज साधारण ५० तक्रारी मनपाच्या पथकाकडे येतात. त्यानुसार मनपा कंत्राटदाराला सूचित करते. त्यानंतर कंत्राटदार कुत्र्यांना पकडून आणतो. एका कुत्र्याच्या नसबंदीसाठी मनपा कंत्राटदाराला ८८० रुपये देते. महिन्याला ७५० कुत्र्यांची नसबंदी केली जाते.
मनपाकडे भटके कुत्रे पकडण्यासाठी १०४ पिंजरे आहेत. एका पिंजऱ्यात २ कुत्रे ठेवता येतात. मनपाने आणखी काही पिंजरे मागविले आहे. त्यामुळे जास्त कुत्रे पकडून त्यांना पिंजऱ्यात ठेवून त्यांची नसबंदी करणे शक्य होईल. त्यातून त्यांच्या उत्पत्तीवर अधिक प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. - डॉ. अश्विनी पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी
पाठलाग करून घेतात चावामहापालिका हद्दीत १०० पेक्षा जास्त बेकायदा झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत जास्त आहे. काही भटकी कुत्री काही विशेष रस्त्यांवर दुचाकी चालक, रिक्षा चालकांचा पाठलाग करून चावा घेण्याचा प्रयत्न करतात.