कल्याण: येथील कोळशेवाडी आणि खडकपाडा पोलिसांनी एमडी ड्रग्स विरोधात मोठी कारवाई केली आहे. कोळसेवाडी पोलिसांनी ड्रग्स तस्कर नायजेरियन नागरिकासह दोन आरोपींना अटक केली आहे. तर कल्याण खडकपाडा पोलिसांनी कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्ती मधून एका महिला ड्रग्स तस्करला अटक केली आहे. या चार अटक आरोपींकडून पोलिसांनी सात लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम एमडी ड्रग्स हस्तगत केले आहे.चुकवूईमेका जोसेफ इमेका असं नायजेरियन ड्रग्स तस्कराचे नाव आहे तो नवी मुंबईतील राहणारा आहे. तर सनील यादव, युवराज गुप्ता, इराणी महिला फाजी इराणी अशी इतर आरोपींची नावं आहेत.
कल्याण कोळशेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पूर्वेकडील शंभर फुटी रोड येथे नाकाबंदी केली होती. या नाकाबंदी दरम्यान एका रिक्षामध्ये दोघजण संशयास्पद रित्या आढळून आले. पोलिसांना बघून रिक्षाचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. ऑटो रिक्षा ताब्यात घेत सुनील यादव व युवराज गुप्ता या दोन जणांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळ एम डी ड्रग्स आढळून आले.
पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता या दोघांनी नवी मुंबई येथील एका नायजेरियन नागरिक एम डी ड्रग्स विकत असल्याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी नवी मुंबई येथे सापळा लावून चुकवूईमेका जोसेफ इमेका या नायजेरियन ड्रग्स तस्कराला बेडया ठोकल्या.
या तिघांकडून एकूण पावणे सहा लाख किमतीचे सुमारे २८५ ग्रॅम ड्रग्स जप्त केले आहेत. तर खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांचे पथक कल्याण जवळील आंबिवली इराणी वस्ती परिसरात गस्त घालत असताना एक इराणी महिला संशयस्पदरीत्या फिरताना आढळून आली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेत तिची झडती घेतली असता तिच्याकडे सुमारे ६६ हजार रुपये किमतीचे ३४ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्स आढळून आले. फिजा इराणी असे या महिलेचे नाव असल्याची माहीती कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली. दरम्यान कल्याण डोंबिवलीत ड्रग्स तस्करी च्या रॅकेट मध्ये नायजेरियन नागरिकाचा सहभाग असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या १५ दिवसात १३ आरोपी अटक
मागील १५ दिवसात कोळसेवाडी पोलिसांनी ७३ गांजा विक्रीचे गुन्हे दाखल करीत ५० हजाराचा गांजा जप्त केला आहे. गांजा पिणा-या १० जणांविरोधात गुन्हे दाखल करून यात एकुण १३ आरोपींना अटक केल्याची माहीती वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली.