डोंबिवली : मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास काॅर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे. त्याद्वारे अद्ययावत डिझाइनच्या लोकलची बांधणी, डबे वाढवणे, १२ ऐवजी १५ डब्यांची लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणे, वाढीव रेल्वेमार्ग टाकणे, आदी कामांसाठी मध्य व पश्चिम रेल्वेला निधी पुरवला जातो. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने रेल्वेमार्गांवर ३२ नव्या रेल्वेस्थानकांचे बांधकाम करण्यास तत्त्वतः मंजुरी दिली. मात्र, त्याच्या पूर्ततेसाठी निधीची तरतूद नसल्याने ते कागदावरच आहेत. तो निधी एमआरव्हीसीने द्यावा, असे पत्र ठाणे रेल्वे प्रवासी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी मंडळाचे अध्यक्ष विलास वाडेकर यांना दिले.
माटुंगा-सायन मार्गावर किंग सर्कल (मेन लाइन) स्टेशन बांधून ते स्कायवॉकने सध्याच्या हार्बर लाइनवरील किंग सर्कल स्टेशनला जोडणे, कोपरी, खारेगाव, कासगाव व चामटो, गुरवली, वेल्होळी, वसई-कोपर-पनवेल मार्गावर पायेगाव, डुंगे व कलवार, पिंपळास, नांदिवली व आगासन, पलावा, निरवली व निघू, पेंढार, टेंबोडे व नवीन पनवेल, खारपाडा, पेण - कासूदरम्यान वडखळ तसेच पश्चिम रेल्वेवर वाघवी, सारतोडी, माकून्सर, चिंतूपाडा, खराळे रोड, पांचाली, बीएसईएस काॅलनी ही स्थानके होणार आहेत. ही नवीन रेल्वे स्थानके निर्माण करण्यासाठी मंजुरी असली, तरी त्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली नसल्याची माहिती देशमुख यांना मिळाली आहे.
टिळकनगर, कोपर स्थानके स्वत:च्या सोयीसाठी
मध्य व पश्चिम रेल्वेला स्वतःच्या निधीतून नवीन स्थानक निर्माण करणे शक्य होत नसल्यामुळे १९६५ मध्ये कांजूरमार्ग हे नवीन स्थानक तयार करून कार्यान्वित झाले.
त्यानंतर ६० वर्षांत मध्य रेल्वेवर टिळकनगर, नाहूर, कोपर, कल्याण-कसारा दरम्यान उंबरमाळी, तानशेत, ट्रान्स हार्बरवर दिघा; तर पश्चिम रेल्वेवर राममंदिर ही सात स्थानके बांधली. यांपैकी टिळकनगर व कोपर ही स्थानके रेल्वेने स्वत:च्या सोयीसाठी बनवली आहेत.