डोंबिवली: येथील पश्चिमेकडील एका इमारतीमधील प्रत्येक फ्लॅट ला कर आकारणी करून देण्याकरीता प्रत्येक फ्लॅटमागे ३ हजार रूपये प्रमाणे ३६ फ्लॅट साठी १ लाख ८ हजार रूपयांची लाच मागणा-या केडीएमसीच्या ह प्रभागातील कर विभागाच्या शिपायासह एका सेवानिवृत्त कर्मचा-याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५० हजार रूपयांची लाच स्विकारताना मंगळवारी रंगेहाथ अटक केली.
योगेश माधवराव महाले ( वय ४०) आणि सूर्यभान नानाजी कर्डक ( वय ६० ) अशी लाच स्विकारणा-या दोघांची नाव आहेत. महाले हे कर विभागातील शिपाई आहेत तर कर्डक हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. ते ऑक्टोबर महिन्यात कर विभागातून निवृत्त झाले आहेत. मनपाच्या ह प्रभाग कार्यालयाच्या बाहेरच दोघांना सायंकाळी ४ वाजता सापळा लावून ५० हजाराची लाच स्विकारताना अटक केली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विलास मते यांच्या पथकाने ही कारवाई केली. महाले आणि कर्डक यांनी लाचेची मागणी केल्यानंतर तक्रारदाराने ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.