डोंबिवली: महावितरणच्या डोंबिवली विभागातील पूर्व आणि पश्चिम, कोपर, ठाकुर्ली पूर्व ,पश्चिम या ठिकाणी वीज चोरी विरोधात महावितरणची धडक मोहीम सुरु आहे. ९ डिसेंबरपासून सुरु असलेल्या या मोहिमेत वीजचोरी प्रकरणी ३९ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून वीज चोरीच्या बिलासह दहा लाखांपेक्षा अधिकचा दंड संबंधितांकडून वसूल करण्यात आला आहे. सुलभ प्रक्रियेद्वारे महावितरणकडून मिळणारी अधिकृत जोडणी घेऊनच विजेचा वापर करण्याचे आवाहन कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केले आहे.
या भागात मोहीम सुरु झाल्यापासून २६१० वीज जोडण्याची तपासणी करण्यात आली. यातील २६ ग्राहकांकडे वीजचोरी होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध वीज कायदा अन्वये कारवाई सुरु आहे. ८ लाख ४७ हजार रुपये संबंधितांकडून वसूल करण्यात आले आहेत. तर या कारवाईला प्रतिसाद न देणाऱ्या दोघांविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय विजेचा अनधिकृत वापर करणाऱ्या १३ ग्राहकांविरुद्ध कारवाई करून संबंधितांकडून दोन लाख एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम नियमितपणे सुरु राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी स्पष्ट केले.