कल्याण : ऑनलाइन नोकरीचे प्रलोभन दाखवत एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला दोन महिलांनी ४० लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात प्रिया व अविका मिश्रा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला प्रतिक सिंग (२५) पंधरा दिवसांपूर्वी घरी असताना प्रिया आणि अविका या दोन महिलांनी मोबाईलच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क साधला. ऑनलाईन माध्यमातून अर्धवेळ नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन प्रतीकला दाखवले. घरबसल्या अर्धवेळ नोकरी मिळते म्हणून प्रतिकने या महिलांच्या संपर्काला प्रतिसाद दिला. या महिलांनी प्रतिकला सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्क करून एक लिंक पाठवली. या लिंकच्या माध्यमातून प्रतिकला टप्प्याने गुंतवणूक करण्यास भाग पडले. अधिकचा नफा मिळेल असे आश्वासन प्रिया व अविका यांनी प्रतिकला दिले. प्रतिकच्या बँक खात्यातील ४० लाख ४० हजार तीनशे रुपये दोघींनी आपल्या खात्यात वळवून घेतले.
गुंतवणुकीवर तातडीने नफा मिळत असल्याने प्रतिक त्या नफ्याची मागणी दोघींकडे करू लागला. परंतु, त्या महिलांनी प्रतिकच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. गुंतवणूक केलेली मूळ रक्कम परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे प्रतीकच्या लक्षात आले. याप्रकरणी प्रतीकने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दोघा महिलांविरोधात तक्रार दाखल केली.