कल्याण-नेवाळी येथील डावलपाडा येथे एमआयडीसीने रस्त्यावर खोदलेल्या खड्ड्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना २४ मार्च रोजी घडली होती. या मुलांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कल्याण पूर्वेचे शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी पाठपुरावा केला होता. या दोन मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत एमआयडीसी ठेकेदाराकडून देण्यात आली आहे.
ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा संतप्त नागरीकांनी दोन्ही मुलाचे मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यावेळी शहर प्रमुख गायकवाड यांनी मध्यस्थी केली होती. सनी प्रमोद यादव आणि सूरज राजभर या मृत मुलांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. कल्याणचे खासदार -डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा विषय शहर प्रमुख गायकवाड यांनी मांडला होता. खासदार शिंदे यांनी यात लक्ष घालून हा विषय मार्गी लावला. एमआयडीच्या ठेकेदाराकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मृत मुलांच्या कुटुंबियांना आज देण्यात आली. या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख चैनू जाधव, अधिकारी सुभाष गायक,र विभाग प्रमुख अशोक म्हात्रे, विलास पाटील, किरण पांडे आदी उपस्थित होते.