मुरलीधर भवार, कल्याण- कल्याण शीळ रस्त्यालगत असलेल्या सोनारपाडा येथील रेरा प्रकरणातील तळ अधिक पाच मजली बेकायदा इमारत पाडण्याची कारवाई आज पूर्ण करण्यात आली. ही इमारत पाडण्याची कारवाई १७ मार्च पासून सुरु होती. ही इमारत मॅन्युअली तोडण्यात आली.
ही इमारत एल टाईममध्ये असल्याने इमारतीच्या दोन्ही बाजूस उच्च दाबाच्या वीज वाहिन्या होत्या. वीज पुरवठा खंडीत करुन ही कारवाई करावी लागली. त्यासाठी तीन वेळा वीज पुरवठा खंडीत करावा लागला होता. इमारतीचे पाड काम करताना नागरीकांना त्रास होऊ नये यासाठी दोन वेळा या ठिकाणचा रस्ता बंद ठेवण्यात आला होता.ज्या इमारतींना ही इमारत लागून होती. त्या इमारतीमधील नागरीकांनाही कारवाई दरम्यान घराबाहेर काढण्यात आले होते. महापालिकेने पोलीस बंदोबस्तात पोकलन जेसीबी आणि हाय जो क्रशर यंत्राचा वापर करीत इमारतीचे पाडकाम पूर्ण केले आहे.
महापालिकेच्या ई प्रभागाचे सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी ही कारवाई केली. माहिती अधिकार कार्यकर्ते आणि वास्तूविशारद संदीप पाटील यांनी महापालिका हद्दीतील ६५ बिल्डरांनी महापालिकेच्या खोट्या सही शिक्क्याचा वापर करीत महापालिकेनेची बनावट परवानगी तयार करुन त्या आधारे रेरा प्राधिकरणाकडे बांधकाम प्रमाणपत्र प्राप्त केले होते. ही बाब उघड होताच ६५ बेकायदा बांधकाम करणाऱ््या बिल्डरांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याची चाैकशी एसआयटी आणि ईडीकडून सुरु आहे. या प्रकरणात १० जणांना अटकही करण्यात आली होती. याच ६५ रेरा प्रकरणातील सोनारपाड्यातील ही तळ अधिक सहा मजली इमारत होती. या इमारतीचे बांधकाम किशाेर म्हात्रे यांनी केले होते.