कल्याण- अंबरनाथ तालुक्यातील मांगरुळ गावातील कुस्तीपटू वैष्णवी पाटील ही पहिल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत उपविजेती ठरली. आगरी यूथ फाेरमने तिच्या घरी जाऊन तिची भेट घेतली. तिला ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला. तिचा सत्कार करीत तिच्या पाठीवर काैतुकाची थाप दिली आहे.
फाेरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह पदाधिकारी शरद पाटील, जालिंदर पाटील, विजय पाटील, वासूदेव पाटील, रंगनाथ ठाकूर, विश्वनाथ रसाळ, निलेश म्हात्रे आणि पांडूरंग म्हात्रे या प्रसंगी उपस्थित हाेते. या प्रसंगी वैष्णवी म्हणाली की, पहिल्या महाराष्ट्र महिला केसरी स्पर्धेत विजेते पद हुकले असले तरी मी उपविजेती ठरली. यापुढे आणखीन मेहनत घेऊन विजेती हाेणार. माझ्यावर हाेत असलेल्या काैतुकाचा वर्षाव पाहता. मीच विजेती झाल्याचे मला वाटते आहे. कुस्तीत साक्षी मलिक हीला मी आदर्श मानते. माझ्या हातून काही चुका झाल्या त्या या पुढे टाळणार आहे. कुस्तीच्या सरावसाठी लागणाऱ्या खुराकीचा महिन्याला २० ते २५ हजार रुपये खर्च हाेताे. माझे आई पुष्पा आणि वडील दिलीप हे खानावळ चालवितात. त्यातून हा खर्च भागताे. सरकारकडून थाेडीफार मदत मिळते. सिनिय नॅशनल स्पर्धेत मला ब्राँझ पदक मिळाले असून सरकारने मला नाेकरी द्यावी अशी आपेक्षा व्यक्त केली आहे. आगरी यूथ फाेरमने मला दिलेल्या मदतीचा मला आधार हाेणार आहे.
फाेरमचे अध्यक्ष वझे यांनी सांगितले की, आगरी समाजातील मुलगी महाराष्ट्रात उपविजेती ठरली. याचा आम्हाला अभिमान आहे. तिचा आदर्श अन्य खेळाडूंनीही घ्यावा. आगरी महाेत्सवाला १८ वर्षे पूर्ण झाली. पहिली तीन वर्षे महाेत्सवात कुस्तीचा कार्यक्रम ठेवला जात हाेता. ताे बंद करावा लागला. फाेरमकडून खेळांडूना प्राेत्साहन दिले जाते. यापुढेही दिले जाईल.