ठाकुर्ली ते कल्याणदरम्यान नाल्यात पडलेल्या रिषिका रुमाल (६ महिने) हिच्यावर मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी त्याच उपचारासाठी या तान्हुलीला घेऊन तिचे आजोबा व आई गेले होते. परत येताना पावसाने रेल्वेसेवेला फटका बसल्याने त्यांनी रेल्वे मार्गावर उतरून प्रवास सुरू केला. पावसापासून नातीचे संरक्षण व्हावे म्हणून आजोबांनी तिला रेनकोटमध्ये घेतले होते. मात्र, अचानक त्यातून ती निसटली आणि नाल्यात पडली.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता शंकर रुमाल या बाळंतपणासाठी हैदराबाद येथून आपल्या माहेरी भिवंडीत आल्या होत्या. बुधवारी तिच्या नियमित तपासणीसाठी योगिता आपले वडील ज्ञानेश्वर पोंगुल यांच्या सोबत मुंबईला गेली होती. जाताना ते गाडीने गेले होते, स्टेशनवर दुपारी गर्दी नसल्याने मुंबईहून अंबरनाथ लोकलने ठाकुर्लीपर्यंत आले. कल्याण स्थानकात उतरून त्यांना भिवंडीला जायचे होते. मात्र, मुसळधार पावसाने रेल्वे सेवा बंद झाल्याने योगिता, वडील ज्ञानेश्वर हे चिमुकल्या रिषिकाला घेऊन रेल्वेमार्गातून चालत निघाले होते
ज्ञानेश्वर पोंगुल यांनी त्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. "दोन-तीन तास लोकल रेल्वे ट्रॅकवर थांबली होती. सर्वजण खाली उतरून जात होते. आम्ही पण लोकलमधून खाली उतरून जाण्याचं ठरवलं. ट्रॅकवर चालत असताना आधी माध्या मुलीचा पाय घसरला आणि त्यानंतर मी तिला सावरलं आणि माझ्या नातीला मी रेनकोटमध्ये गुंडाळून माझ्या हातात घेतलं होते. मात्र माझाही पाय घसरला आणि माझ्या हातात असलेली माझी नात रेनकोटमधून कधी नात्यात पडली मला समजलंच नाही."
"बाळ पडल्याचं लोकांच्या लक्षात आल्यानंतर रेनकोटमध्ये बाळ नसल्याचं आमच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत माझी नात नाल्यात वाहून गेली होती" असं ज्ञानेश्वर यांनी सांगितले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दुर्दैवी रिषिकाची आई योगिता ही भिवंडीतील धामणकर नाका परिसरातील राहणारी आहे. पाच ते सहा महिन्यांची ही मुलगी असून तिचे नाव रिषिका ठेवण्यात आले होते. ठाकुर्ली कल्याण मार्गावर रुळाखालील नाल्यात पडून रिषिका रुमाल या लहान बाळाचा शोध तिसऱ्या दिवशीही तपास यंत्रणेला लागला नाही. एनडीआरएफने गुरुवारीच तपास थांबवला होता. स्थानिक अग्निशमन यंत्रणा आणि लोहमार्ग पोलिसांनी मात्र तिचा शोध सुरूच ठेवला आहे.