लोकमत न्यूज नेटवर्क: कल्याण
कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात झाली. आतापर्यंत १५ ते १८ या वयोगटातील ६३ हजार ७७६ मुलांचे लसीकरण म्हणजेच ६८ टक्के इतके लसीकरण झालेले आहे. महापालिका परिसरातील एकूण २३९ शाळा /कनिष्ठ महाविद्यालयात तसेच महापालिकेच्या लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे.
डोंबिवलीतील अस्तित्व या दिव्यांग व कर्णबधिर मुलांच्या शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगटामधील ३५ मुलांना कोवॅक्सिन लसीची पहिली मात्रा देण्यात आली. तसेच १८ वर्षावरील १२ व्यक्तींना कोविशिल्ड लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. महानगरपालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रातील डॉ. शीतल पाटील व त्यांच्या पथकाने अस्तित्व शाळेत जाऊन दिव्यांग मुलांच्या केलेल्या या लसीकरणाबाबत अस्तित्व संस्थेच्या सचिव राधिका गुप्ते यांनी महानगरपालिकेचे आभार मानले आहेत.