कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नाटय़गृहाच्या भाडय़ात 75 टक्के सूट 31 डिसेंबर्पयत देण्यात आली आहे अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.
कोरोना काळात मार्च महिन्यापासून नाटय़गृहे बंद होती. नाटय़गृहे मर्यादीत क्षमतेनुसार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र नाटय़गृहांना आकारले जात असलेले भाडे जास्त आहे. कोरोना काळानंतर नाटय़ संस्थांना हे भाडे परवडणारे नाही. नाटय़गृहांच्या भाडय़ात सूट देण्याची मागणी नाटय़ अभिनेते प्रशांत दामले यांनी केली होती. या मागणीसाठी त्यांनी दोन दिवसापूर्वीच महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांची भेट घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्तांनी आज सांगितले. महापालिका हद्दीत कल्याणमध्ये अत्रे रंगमंदिर आणि डोंबिवली सावित्रीबाई नाटय़मंदिर आहे. या दोन्ही नाटय़गृहांच्या भाडय़ात 31 डिसेंबर्पयत 75 टक्के सूट दिली जाणार आहे.