डोंबिवली: आज देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे. म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. या निमित्ताने भाजपच्या वतीने शहरात आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत, रविवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आबालवृद्धांनी उदंड प्रतिसाद देत सायकल चालवण्याचा आनन्द लुटला. या सायकल रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे वय वर्षे ५ चा चिमुकला आणि ६८ वर्षांच्या आजोबांनी त्यात सहभाग घेतला होता. सारंग मुळे हे त्यांच्या ३३ वर्षे जुन्या असलेल्या सायकलवरून या रॅलीत सहभागी झाले होते.
संतोष पाटील आणि त्यांचा शाळेत जाणार मुलगा हार्दिक पाटील हे वैशिष्ट्यपूर्ण आशा 'डबल - सिटिंग सायकल' वरून सहभागी झाले होते. विविध वयोगटातील व्यक्तींचा उत्स्फूर्त सहभाग हे या सायकल रॅलीचे वैशिष्ट्य ठरले. राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सामाजिक सुरक्षा हा संदेश घेऊन भारतातील प्रत्येक जिल्ह्यात भाजयुमोकडून अशा स्वरूपाची सायकल रॅली आयोजित करण्यात आली डोंबिवली येथे आमदार रवींद्र चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, माजी नगरसेवक संदीप पुराणिक, अपूर्व कदम ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू मैदान येथून सायकल रॅलीस प्रारंभ झाला. स्मृतीस्थळ, घरडा सर्कल येथे भारत मातेचा जयघोष करून, शौर्य स्मरकास अभिवादन करण्यात आले.
भाजप डोंबिवली ग्रामीण मंडल कार्यालयात समारोप प्रसंगी सर्व सायकलपटूंनी त्यांचे सायकलिंग क्षेत्रातील विविध अनुभव सांगितले. भाजयुमो पदाधिकारी अथर्व कुलकर्णी आणि आरती देशमुख ह्यांनी सम्पूर्ण सायकल यात्रेचे नियोजन पाहिल्याचे युवा।मोर्चाध्यक्ष माहीर देसाई म्हणाले.