सदानंद नाईक, उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर मंगळवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अभियानात आमदार कुमार आयलानी, आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह सामाजिक संस्था व नागरिक सहभागी झाले होते.
उल्हासनगर कल्याण ते अंबरनाथ रस्त्यावर मंगळवारी राबविण्यात आलेल्या स्वछता मोहिमेत महापालिका सफाई कामगार व विविध स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी व नागरिकांनी सहभाग घेतला. सकाळी साडे नऊ ते ११ वाजण्याच्या दरम्यान राबविलेल्या स्वच्छता अभियान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरवात झाली. स्वच्छता अभियानाचे दोन गट बनविले होते. छत्रपती शिवाजी ।महाराज चौकातून सुरू झालेले अभियानाचा एक गट फॉरवर्ड लाईन चौकाकडे तर दुसरा गट शांतीनगरकडे गेला. यावेळी रस्ते दुभाजकाचीही साफ सफाई करण्यात आली.
महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत आमदार कुमार आयलानी, आयुक्त विकास ढाकणे, अतिरीक्त आयुक्त किशोर गवस, जमीर लेंगरेकर, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य बाजार निरीक्षक विनोद केणे, महापालिकेचे विभाग विभागप्रमुख, स्वच्छता निरीक्षक, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी, आरकेटी, वेदांता, सेवा सदन, सीएचएम कॉलेजचे एनएसएसचे विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवी संस्था पदाधिकारी आदींनी सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे कर्मचाऱ्यासह ८०० पेक्षा जास्त जण सहभागी झाले होते.