डोंबिवली- श्री गणेशोत्सवानिमित्त पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने जनजागृती केली. या उत्सवाच्या पर्यावरणपूरकतेच्या दिशेने एक पाऊल म्हणजे नैसर्गिक साधनसंपत्तीचे प्रदूषण होणार नाही अशा साहित्याच्या मूर्ती असणे. या सर्व बाबींचा विचार करून पर्यावरण दक्षता मंडळाने यंदाही शाडू माती, लाल माती या मूर्ती बनविण्याचा प्रचार केला. त्यात सुमारे ८०० शालेय विद्यार्थी आणि जनमानसात ग्रीन गणेशाचा संदेश पोहोचवण्यासाठी पुढाकार घेतला. आठवड्यात विविध ठिकाणी झालेल्या कार्यशाळेची सुरुवात श्रीगणेशाच्या प्रार्थनेने होते आणि त्यानंतर मातीचा वापर करून साध्या मूर्तीचे प्रात्यक्षिक दाखवले जाते. प्रात्यक्षिकानंतर सहभागींना त्यांच्या स्वत:च्या सर्जनशीलतेने मूर्ती बनवण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
कार्यशाळेचा उद्देशही उपस्थितांना समजावून सांगितला जातो. खालील संस्थांमध्ये अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचे मंडळाच्या रुपाली शाईवाले यांनी सांगितले. नूतन ज्ञानमंदिर, श्री गणेश मंदिर संस्थान, शारदा मंदिर शाळा, मंजुनाथा कॉलेज, त्रिवेणी मजिस्ता सीएचएस, एमके स्कूल, श्री गणेश नगर विद्यामंदिर, के.आर. कोतकर विद्यालय या सर्व शाळा कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. श्री लक्ष्मी नारायण संस्था, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पूर्व, रोटरी क्लब ऑफ कल्याण, रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण, रोटरी क्लब ऑफ कल्याण सिटी, रोटरी क्लब ऑफ सेंट्रल यांचे सहकार्य लाभले. कल्याण आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी या संस्थांनी मदत केली.