लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : आपल्याकडे सर्वोच्च स्थान असणाऱ्या चारही वेदांचे डोंबिवलीच्या या अवलियाने मराठीत भाषांतर केले आहे. ते ही वयाच्या अवघ्या 99 व्या वर्षी आणि कोरोनाला हरवून. होय हे खरं आहे डोंबिवलीला राज्याची सांस्कृतिक उपराजधानी म्हटलं जात ते उगाच नाही. डोंबिवली शहराने आजवर अनेक कर्तृत्ववान व्यक्ती दिल्या आहेत. या व्यक्तींमध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे. डोंबिवलीतील डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी आपल्या गुरूच्या आज्ञेचे पालन करत संस्कृतमधील चारही वेदांचे टिप्पणीसह अनुवाद केले आहेत. आपल्या गौरवशाली आणि प्रतिभासंपन्न संस्कृतीची ओळख असणारे चारही वेद, संस्कृत उपनिषदे आणि वाङमयाचे मराठीत अनुवाद करून हा सर्व ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहचण्याच्या ध्यासातून डॉ. कुलकर्णी यांनी हा विस्मयकारी प्रपंच मांडला आहे. (translation of Vedas in Marathi by Dr. Bhimrao Kulkarni of Dombivali. )
केईएम रुग्णालयातून प्रोफेसर म्हणून निवृत्त झाल्यानंतर डॉ. भीमराव कुलकर्णी यांनी 1996 पासून वेदांच्या अनुवादाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी 6 वर्षे माहिती गोळा करण्याबरोबरच प्रचंड वाचनही केले. त्यांचे यजुर्वेद आणि ऋग्वेद हे दोन्ही मराठीतील ग्रंथ प्रसिद्ध झाले असून सामवेद आणि अथर्ववेद या ग्रंथाचे अनुवाद पूर्ण झाले आहेत. कोरोनाकाळात प्रिंटिंग बंद असल्याने या ग्रंथाची छपाई थांबली आहे. मात्र ठाण्यातील दाजी पणशीकर यांनी या ग्रंथाच्या पब्लिशिंगची जबाबदारी स्वीकारली आहे. यंदाच्या 18 मे रोजी 99 व्या वर्षात पदार्पण केलेल्या डॉ. कुलकर्णी यांना महाराष्ट्र सरकारने वेद विद्या विशारद पुरस्कारानेही सन्मानीत केले आहे.
शाळांमधून संस्कृतचे शिक्षणच बंद झाल्याने आपल्या गौरवशाली आणि प्रतिभासंपन्न संस्कृतीचे ज्ञान देणारे हे वाङमय काळाच्या ओघात लुप्त होण्याची भीती त्यांना वाटत आहे. आजच्या पिढीला संस्कृत वाचता येत नसल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे. शालेय जीवनापासूनच संस्कृत विषय सुरू करण्याची त्यांची मागणी आहे. ज्यामुळे संस्कृत वाङमय नव्या पिढीला आत्मसात करणे सोयीचे होईल