कल्याण : भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे निमित्याने कल्याण येथे सलग ३६ तास व एकत्रित १०० तासांचा अखंड वाचनयज्ञ उपक्रमाचे आयोजन अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने करण्यात आला आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे वाचननगरी अंतर्गत ना. धो. महानोर आणि साने गुरुजी वाचन कट्ट्यावर १४ ते १५ ऑक्टोबर रोजी सलग ३६ तास अखंड ११०० हून अधिक कवी , साहित्यिक व वाचक अभिवाचन करणार असून त्यात दहा हजारांहून अधिक रसिक उपस्थित राहतील असा दावा आयोजक हेमंत नेहते यांनी केला.
डॉ योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने आणि बालक मंदिर संस्था व कल्याण सार्वजनिक वाचनालय यांच्या सहकार्याने बालक मंदिर, टिळक चौक, कल्याण पश्चिम येथे रविवारी सकाळी ८ ते रात्री १२ या वेळेत वाचन यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड वाचन यज्ञ उपक्रमामध्ये वि. दा सावरकर सत्र , वि. आ. बुवा वाचनसत्र , बाबासाहेब पुरंदरे वाचन सत्र , कवी केशवसुत वाचन सत्र , नारायण धारप वाचन सत्र , शांता बाई शेळके वाचन सत्र , वामनदादा कर्डक वाचन सत्र , आण्णाभाऊ साठे वाचन सत्र , भारताचार्य वैद्य वाचन सत्र अशा एकूण ५० हून अधिक सत्रांमध्ये वाचन करण्यात येणार आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिव व संयोजक हेमंत नेहते यांनी दिली. १५ शाळांचे विद्यार्थी ह्या उपक्रमात सहभागी होणार आहेत.