कल्याण : शहराच्या पूर्वभागातील कैलासनगरात एका इमारतीसाठी खाेदलेल्या खड्डयातील पाण्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा बुडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे. खड्ड्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव रेहान शेख असे आहे. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कैलासनगरात राहणारा रेहान शेख हा आज सकाळी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. ताे शाळेत गेला नाही. त्या परिसरात असलेल्या माेकळ्या जागेवर खेळण्यासाठी गेला. रेहान ज्या ठिकाणी खेळत हाेता. त्याच ठिकाणी एका बिल्डरने इमारतीसाठी माेठ्ठा खड्डा खाेदला आहे. या खडड्यात पाणी साचलेले आहे. रेहान खेळत असताना त्याचा बाॅल त्या खड्ड्यातील पाण्यात गेला. हा बाॅल काढण्यासाठी रेहान खड्ड्याच्या दिशेने गेला. बाॅल काढण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा ताेल जाऊन ताे साचलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडला. त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही नागरीकांचे याकडे लक्ष गेल्याने त्यांनी तात्काळ घटनास्थळी घाव घेतली. घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ अग्नीशमन दलास दिली. अग्नीशमन दलाने घटनास्थली धाव घेतली. रेहानचा मृतदेह शाेधण्यास सुरुवात केली. अवघ्या एका तासाच रेहानचा मृतदेह अग्नीशमन दलाच्या जवानांच्या हाती लागला आहे. त्याचा मृतदेह शवविच्छदेनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
पाण्याने भरलेल्या खड्ड्यात गाळ हाेता. त्या गाळात रुतल्याने रेहानला बाहेर येता आले नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी दिली आहे. इमारतीसाठी खड्डा खाेदणाऱ्या बिल्डरने त्याठिकाणी सुरक्षिततेची काेणतीही उपाययाेजना केली नाही. साधी संरक्षक भिंत देखील बांधण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे या ठिकाणी भविष्यातही अशा प्रकारच्या जीवघेण्या घटना घडू शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरीकांच्या जिविताशी खेळणाऱ्या बिल्डरच्या निष्काळजीपणामुळेच रेहानचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रेहानच्या मृत्यूस संबंधित बिल्डर जबाबदार असून त्याच्या विराेधात कारवाई केली जावी अशी स्थानिक नागरीकांची मागणी आहे.