डोंबिवली : मुंबईमध्ये उपचाराच्या निमित्ताने गेलेल्या आरुषी रुमाले (सहा महिने) ही आजोबांच्या हातातून निसटून ठाकुर्ली कल्याण रेल्वे मार्गावरील पत्रिपुलानजीकच्या रुळाखालील नाल्यात पडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. तेव्हापासून खाडीपात्रात तिचा शोध सुरू होता, मात्र ती बुधवारी संध्याकाळपर्यंत आढळून आली नसल्याने एनडीआरएफने वीस तासांनी शोधकार्य थांबवले.
त्याबाबत डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितले की, त्या बाळाचे शोध कार्य सुरूच होते, मंगळवारी रात्री उशिरापर्यन्त अग्निशमन यंत्रणा, एनडीआरएफ लोहमार्ग पोलीस यांनी शोध घेतला, बुधवारी सकाळी ९ नंतर।दुपारी ३ वाजेपर्यंत अग्निशमनसह अन्य यंत्रणांनी शोध घेतला, कल्याण, डोंबिवली, भिवंडीसाईडचा किनारा ते थेट मुंब्रा पर्यंत शोध कार्य सुरू होते.
एनडीआरएफचे २३ अधिकारी, कर्मचारी कार्यरत होते, दोन बोटींमधून त्यांनी शोध घेतला. लोहमार्ग पोलिसांनीही डोंबिवली, ठाकुर्ली भागात तीन तास जाऊन शोध घेतला, परंतु दुपारी ४ वाजेपर्यंत शोध लागला नसल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाची एक टीम थेट मुंब्रा भागातील खाडीपर्यंत जाऊन शोध घेतला. लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने, एनडीआरएफ युनिटचे योगेशकुमार शर्मा यांसह अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोधकार्य सुरु होते.
घटनास्थळी कचोरे येथील ग्रामस्थ मंडळींनी देखील शोधकार्यात मदत केली. बाळ पाण्यात पडल्याचे समजल्यापासून त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. खाडीतील किनाऱ्या जवळील गाळ, झाडी झुडपं, कांदलवन यामध्ये यंत्रणांनी शोध घेतला, पण बाळ मात्र कुठेही आढळून आले नाही. दिवसभरात बाळाचे पालक घटनास्थळी आले नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
एनडीआरएफ यंत्रणेसोबत मी देखील स्वतः बुधवारी सकाळपासून तीन तास घटनास्थळापासून डोंबिवली खाडी परिसरात बाळाला शोधायला गेले होते. तीन तास खाडी किनाऱ्यावरील गाळ, झाडी, कांदलवन, वनस्पती यात पाहणी करण्यात आली. ४ वाजेपर्यंत शोध कार्य सुरू होते, तरी बाळाचा शोध लागलेला नव्हता. - अर्चना दुसाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली लोहमार्ग.