भोजन शाकाहारी किंवा मांसाहारी असले, तरी ते चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट तयार करून तृप्तीचा ढेकर देण्यासाठी मसाले महत्त्वाचे असतात. अनेक प्रकारच्या मसाल्यांची खासियत असते. प्रत्येक प्रदेशानुसार मसाल्याची ओळख पाहावयास मिळते. मसाल्याचे अनेक ब्रॅण्ड बाजारात असले, तरी कल्याण ग्रामीण आणि पंचक्रोशित राया गावचा मसाला प्रसिद्ध आहे. त्याची ख्याती दुबईपर्यंत पोहोचली आहे. मसाल्याचे गाव म्हणून कल्याण तालुक्यातील खडवलीनजीक राया सगळ्यांनाच परिचित आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून कोकणी मुस्लिम बांधव याठिकाणी मसाला विक्रीचे काम करीत आहेत. अनेकांना मसाले घरी करणे शक्य नसते. शेतीच्या कामातून उसंत मिळत नाहीत. खाणावळी चालविणारे, जेवणाचे डबे देणारे, हॉटेल चालविणाऱ्यांना घरचा मसाला करणे शक्य होत नाही. त्यांची मदार विकतच्या मसाल्यावर असते. तो खरेदीसाठी पंचक्राेषीतील नागरिकांचे पाय राया गावाकडे वळतात. आगरी कोळी समाजाच्या हळदी सभारंभाच्या मांसाहारी जेवणात हाच मसाला आचारी वापरतात. दुबईची वारी- मसाला विक्रेत्यांकडे काळा-गोडा मसाला, साधा मसाला, आगरी मसाला, कोकणी मसाला, मध्यम तिखट मसाला, काश्मिरी तर्री मसाला, धणे पावडर आदी प्रकारचे मसाले मिळतात, असे विक्रेते अब्दुल्ला यांनी सांगितले. मसाल्याचे दर किमान ५६० ते कमाल ११०० रुपये किलाे आहेत.- हा मसाला अनेक आचाऱ्यांच्या पसंतीला उतरला असल्याने दुबईला घेऊन जाणारे अनेक लोक आहेत. आचारी हाच मसाला दुबईला सोबत घेऊन जातात. अनेक कोकणी मुस्लिम हे आखातात कामानिमित्त जातात. त्यामुळे रायाचा मसाला साता समुद्रापार पोहोचला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य अनिरुद्ध जाधव यांनी दिली. - ठाणे जिल्हयात भात शेती केली जाते. भात भरडण्यासाठी विविध ठिकाणी राईस मिल आहेत. एकट्या राया गावात १५ राईस मिल आहेत. भात भरडण्यासाठी येणारे शेतकरी रायात येतात. भात भरडून घेऊन जात असताना रायाचा मसालाही सोबत नेतात.