अनिकेत घमंडी, डोंबिवली : महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम निरंतर सुरू आहे. कारवाईनंतर वीजचोरीच्या देयकाचा मुदतीत भरणा न करणाऱ्या २३ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या आरोपींकडील १० लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. मांडा शाखा कार्यालयांतर्गत दळवी चाळ, हमजद चाळ, मोहेली रोड, साई हेवन चाळ, सोईल भाई चाळ, उंबारणी रोड, शिफा चाळ, इर्शाद चाळ, चव्हाण चाळ, फरहान चाळ, यास्मिन चाळ, अन्सारी चाळ आदी भागात महावितरणच्या पथकाने ग्राहकांच्या वीजजोडण्यांची तपासणी केली. यात २३ जणांकडून वीज मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळून आले. या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटिस बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा न झाल्याने मांडा शाखा कार्यालयाचे सहायक अभियंता तुकाराम घोडविंदे यांनी मुरबाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार महावितरणने मुरबाड पोलिस ठाण्यात गुरुवारी वीजचोरीचा गुन्हा केला असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर।केले.