कल्याण - शहराच्या पश्चिम भागातील मुन्ना मौलवी या धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्याचा सज्जा कोळसल्याची घटना २२ जून रोजी घडली होती. या घटनेनंतर या इमारतीत राहणाऱ््या नागरीकांना घरे खाली करण्याचे आदेश कल्याण डोंबिवली महापालिकेने दिले होते. ही इमारत धोकादायक असताना देखील नागरीकांनी घरे खाली केली नसल्याने इमारतीचे मालक शगुफ्ता मुनीर मौलवी यांच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२२ जूनच्या आदल्या दिवशी कल्याणमध्ये पाऊस पडला होता. पावसामुळे कल्याण पश्चिमेतील मौलवी कंपाऊंडला लागून असलेल्या तळ अधिक चार मजली धोकादायक इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील सज्जा कोसळला. हा सज्जा कोसळल्याने इमारती खालून रस्त्याने जात असलेल्या मायलेकी जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत उपायुक्त धर्येशील जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. धोकादायक इमारतीमधील नागरीकांना घरातून अन्य ठिकाणी स्थलांतरीत केले जाणार असल्याचे सांगितले. त्यांना भोगवटा प्रमाण पत्र दिले जाईल असेही आश्वासीत केले होते. इमारतीत जवळपास ७५ कुटुंबिय राहतात. त्यापैकी काही जणांनी पहिल्याच दिवशी घरे खाली केली. त्यांना महापालिकेने भोगवटा प्रमाण पत्र दिले नाही. त्यामुळे अन्य नागरीकांनी त्यांची घरे खाली केली नाही. भोगवटा प्रमाणपत्र दिल्याशिवाय घरे खाली करणार नाही असा पावित्रा घेत नागरीकांनी महापालिका मुख्यालय गाठले. त्यांना सुरक्षा रक्षकांनी पिटाळून लावले. संपूर्ण इमारत खाली केल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र दिले जात नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. इमारत पूर्णपणे खाली झाली नाही. नागरीकांनी अन्य ठिकाणी स्थलांतरीत झाले नाही.ही इमारत धोकादायक इसल्याने त्याठिकाणी नागरीकांनी वास्तव्य केल्यास पावसाळ्यात एखादी दुर्घटना होऊन जीवितहानी होऊ शकते. नागरीकांची जीवित हानी टाळण्याकरीता महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तुषार सोनावणे यांनी इमारतीच्या मालक शगुफ्ता मुनीर मौलवी यांच्या विरोधात महापालिका अधिनियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे मौलवी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वारंवार इमारत खाली करण्याच्या नोटिसा देऊन देखील इमारत खाली केली जात नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या धाोकादायक इमारती एखाद्याच्या जिविताला दगाफटका झाल्यास त्याला मौलवी जबाबदार असतील असेही महापालिकेने म्हटले आहे.