अनिकेत घमंडी,डोंबिवली : थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याची घटना वाडा तालुक्यातील नेहरोली येथे घडली आहे. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊराव त्र्यंबक पाटील व त्याची पत्नी तसेच एक अनोळखी युवक (रा. नेहरोली, ता. वाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शांताराम बोंदरे या ग्राहकाच्या गाळ्याचे वीजबिल थकल्याने विद्युत सहायक नवीद शेख व त्यांच्या पथकाने या गाळ्याचा वीजपुरवठा खंडित केला. याच्या रागातून वीज वापरकर्ता आरोपी पाटील व त्याच्या पत्नीने कर्तव्यावर असलेल्या शेख आणि त्यांचे बाह्यस्त्रोत सहायक कर्मचारी अखिलेश मेश्राम यांना बेदम मारहाण केली. तर अनोळखी युवकाने मोबाईल हिसकावून घेत चित्रीकरण डिलिट केले. शेख यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरिक्षक विजय डाखोरे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा न आणता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.